वायुदलाचा ‘जय हो’ ; भारतमातेच्या सुपुत्रांचा जयजयकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 01:13 AM2019-02-27T01:13:12+5:302019-02-27T01:13:35+5:30
पुलवामा घटनेचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाने भल्या पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले आणि देशाबरोबरच शहरातही अक्षरश: दिवाळी साजरी झाली.
नाशिक : पुलवामा घटनेचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाने भल्या पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले आणि देशाबरोबरच शहरातही अक्षरश: दिवाळी साजरी झाली. शहरातील विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने जल्लोष करतानाच भारतमातेच्या सुपुत्रांचा जयजयकार करताना सर्वांचा ऊर अभिमानाने भरून आला.
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात ४४ जवानांना हौतात्म्य पत्कारावे लागले. त्यामुळे देशभरात दहशतवाद्यांच्या विरोधात संतापाची लाट होती, त्याचबरोबर दहशतवाद पुरस्कृत करणाऱ्या पाकिस्तानला काही तरी धडा शिकवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यानुरूप पहाटेच्या सुमारास भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले. सकाळी ही शुभवार्ता कळाली आणि देशवासीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. आपल्या व्यक्तीगत जीवनातील सुखकारक घटनेइतक्याच आत्मतियतेने सर्वांनी या घटनेचे शेअरिंग केले.
सकाळी भल्या पहाटे झालेल्या एअर स्ट्राइकमुळे जल्लोषाचे वातावरण सुरू झाले. घरात घुसून मारले या कृतीचा आनंद सर्वत्र चर्चांमध्ये दिसत होता. भोसला सैनिकी शाळेत जल्लोष झाल्यानंतर अनेक ठिकाणी जल्लोष झाले.
भारतीय ध्वज मोटारसायकलवर फिरूनही तरुणाई आनंद व्यक्त करीत होते, तर गंगापूररोडवरील प्रसाद सर्कल येथेदेखील अनेकांनी शहीद स्मारकावर येऊन भारतीय सैन्याने घेतलेल्या बदल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच तिरंगा हातात धरून सेल्फी काढले.
औदुंबर कट्टा आणि सप्तरंग मित्र मंडळाच्या वतीने याठिकाणी जल्लोष करण्यात आला. नाशिकरोड, पंचवटी भागातही येथील जल्लोष करण्यात आला. तसेच राजकीय पक्षांच्या वतीनेदेखील शालिमार आणि अन्य चौकात जल्लोष करण्यात आला.
भारतमातेच्या विजयाने दुमदुले शहर
फटाक्यांची आतषबाजी, पाकिस्तानची खोड मोडल्याच्या संदेशासह सोशल मीडियावर भारतीय सैन्याच्या अभिमानाचे संदेश फिरत होते. संपूर्ण शहरात, घराघरात आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये केवळ भारतीय हवाई दलाचा एअर स्ट्राइक हाच विषय चर्चेला होता.
कॉलेजरोडवर अनेक तरूणांनी दुचाकीवर तिरंगा घेत भारतीय विजयाचा आनंदोत्सव साजरा केला़ भारतमाता की जय असा जयघोष करत कॉलेजरोड, गंगापूररोड, शरणपूररोड येथून बाइक रॅली काढली़
भारताने सर्जिकल स्टाइक केल्यानंतर शासकीय तसेच खासगी कार्यालयांमध्येदेखील आनंदोत्सव साजरा करण्यात आल्याचे चित्र दिसत होते़