आकाशवाणी केंद्र : प्रस्तावित मंडईचे मध्यरात्री काम सुरू केल्याने संताप भाजीविक्रेत्यांचे बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:02 AM2018-04-11T01:02:43+5:302018-04-11T01:02:43+5:30
गंगापूररोड : जॉगिंग ट्रॅकजवळील भाजीबाजाराच्या जागेवर बिल्डरकडून कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक खोदकाम व कंटेनरची संरक्षक भिंत तयार करून पोलादी कुंपण घालण्यात आल्याने संतप्त झालेल्या भाजीविक्रे त्यांनी मंगळवारी (दि.१०) सकाळी आंदोलन उभे केले.
गंगापूररोड : आकाशवाणी जॉगिंग ट्रॅकजवळील भाजीबाजाराच्या जागेवर बिल्डरकडून कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक खोदकाम व कंटेनरची संरक्षक भिंत तयार करून पोलादी कुंपण घालण्यात आल्याने संतप्त झालेल्या भाजीविक्रे त्यांनी मंगळवारी (दि.१०) सकाळी आंदोलन उभे केले. मध्यरात्री या आरक्षित भूखंडाचा ताबा बिल्डरने घेतल्याच्या निषेधार्थ भाजीविक्रेत्यांनी थेट आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या जागेवर महापालिका संबंधित जागा मालकाकडून एआरखाली बांधून घेत असलेली भाजी मंडईची जागा अपुरी असून त्याठिकाणी सध्या असलेल्या तीनशे ते साडेतीनशे विक्रेत्यांना जागा पुरणार नाही शिवाय पार्किंगचा प्रश्न निर्माण होणार असल्याने महापालिकेने सर्व भाजीविक्रेते सामावतील अशा पध्दतीने बांधकाम करून देण्याची विक्रेत्यांची मागणी असून ते उपोेषणावर ठाम आहेत.
मनपाच्या विकास आराखड्यात आकाशवाणी केंद्राजवळ असलेल्या भूखंडावर मैदान, व्यापारी संकुल व भाजी मार्केट आणि वाहनतळाचे आरक्षण आहे. समावेशक आरक्षण पध्दतीने जागा मालकाला हा भूखंड विकसित करण्यासाठी २०११ मध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात आला, परंतु अद्याप ते विकसित होऊ शकलेला नाही. मंगळवारी मध्यरात्री रात्रीच्यावेळी कंटेनर उभे करून आत भाजी मंडईसाठी खोदकाम सुरू केल्याचे सकाळी उघड झाले आणि त्यामुळे सकाळी येथे भाजीविक्रे त्यांनी मोठी गर्दी केल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. आंदोलनाची माहिती मिळताच स्थायी समितीच्या अध्यक्ष व परिसराच्या नगरसेवक हिमगौरी आडके, विभागीय अधिकारी नितीन नेर, नगरसेवक स्वाती भामरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कंटेनर हटविण्याचे आदेश दिले जातील तसेच पर्यायी जागा मिळत नाही तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही, असे आश्वासन आडके यांनी आंदोलनकर्त्यांना यावेळी दिले. मात्र जोपर्यंत विकासक कंटेनर हटवित नाहीत तोपर्यंत कुठलीही चर्चा होणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांच्या वतीने किशोर शिरसाट यांनी घेतली. त्यानंतर आकाशवाणी केंद्राजवळील बाजाराच्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आमरण उपोषण सुरू करण्यात आले. ही जागा मनपाने विकसित केली तर एसटी कॉलनी येथील ५४ टपरीधारकांसह भाजी व्यावसायिक, शेतकरी व बेरोजगार तरु णांचे पुनर्वसन होऊ शकते. तसेच जुन्या ए.आर.नुसार विकसनाच्या मोबदल्यात २० टक्के जागा उपलब्ध होणार होती मात्र नवीन ए.आर.नुसार ४० टक्के जागा उपलब्ध होत असल्याचा मुद्दा यावेळी शिरसाठ यांनी उपस्थित केला. यावेळी प्रवीण बोरसे, अजय घोरपडे, संतोष धोंडगे, कुंदन भदाणे, गोरख नाईकवाडी, मोहन गवारे आदींसह आंदोलनकर्ते उपस्थित होते.