अक्षय’ प्रकाशभारनियमनाने वाढली पुन्हा अस्वस्थता
By admin | Published: May 23, 2017 04:25 PM2017-05-23T16:25:32+5:302017-05-23T16:25:32+5:30
राज्यात वाढती विजेची मागणी आणि त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा वीस वीस तास सुरू झालेले अघोषित भारनियमन
नाशिक : राज्यात वाढती विजेची मागणी आणि त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा वीस वीस तास सुरू झालेले अघोषित भारनियमन यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात वीस ते बावीस तास वीज उपलब्ध करून देणाऱ्या अक्षय प्रकाश योजनेचे स्मरण होत असून, काही ठिकाणी तर आंदोलने सुरू झाली आहेत. त्यामुळे या योजनेची पुनर्रुज्जीवनाची पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागात वारंवार वीज समस्येला जावे लागते. त्या पार्श्वभूमीवर २००५ मध्ये आधी अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर जवळ जऊळके कडलग या गावात आणि नंतर नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी ही योजना राबविण्यात आली. त्यानंतर ती राज्यभर पसरत असतानाच महावितरणने ती तात्पुरती स्थगित करण्याच्या नावाखाली बंद पाडली. वास्तविक या योजनेत कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च महावितरणला सोसावा लागत नव्हता. साधारणत: सकाळी आणि सायंकाळी सहा ते दहा यावेळात विजेची मागणी अधिक असते आणि त्याच वेळेत अधिक वीज खेचणाऱ्या म्हणजेच इलेक्ट्रीक शेगड्या, पाणी तापवण्याच्या क्वाइल्स अशाप्रकारची साधने वापरली जातात. विजेचा भार वाढल्याने रोहित्र बिघडते आणि घरगुती विजेची उपकरणेदेखील निकामी ठरतात. त्यापार्श्वभूमीवर ग्रामस्थांना एकत्र आणून आणि विश्वासात घेऊन योजना राबविण्यात आली. अति मागणीच्या वेळी जादा वीज खेचणारी म्हणजेच थ्रीफेज लागणारी उपकरणे वापरायची नाही. मुळात अक्षय प्रकाश योजना राबविण्याची सुरुवातच विजेच्या शेगड्या आणि क्वाईल जमा करण्यापासून होते. त्यानुसार योजना राबविताना ग्रामस्थांचे पथक तयार करून त्याला अधिकार दिले जातात. जी व्यक्ती जादा वीज खेचणाऱ्या साधनांचा वापर करेल किंवा आकडा टाकून वीज चोरेल त्याला आर्थिक दंड करून ती रक्कम गावाच्या कामासाठी वापरण्याचे अधिकारही देण्यात येतात. या माध्यमातून केवळ नाशिक जिल्ह्यातच दोन लाख विजेची उपकरणे नागरिकांनी काढून फेकली होती आणि वीज भारनियमनामुळे त्रस्त होऊन वीज केंद्रांवर आंदोलन आणि हल्ला करणारेच योजनेचे पुढे समर्थक बनले. नाशिक आणि नगरसह राज्यात सुमारे साडेसहा हजार गावांमध्ये अक्षय प्रकाशने ग्रामीण भागात वीस ते बावीस तास वीज उपलब्ध करून दिली होती.