पुन्हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला, लग्नसोहळेही लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:14 AM2021-05-14T04:14:33+5:302021-05-14T04:14:33+5:30

नाशिक : शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध आणखी वाढविण्यात आले असून, बुधवार (दि. १२)पासून प्रशासनाकडून शहरात ...

Akshay Tritiya's moment was missed again, wedding ceremony was also locked down | पुन्हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला, लग्नसोहळेही लॉकडाऊन

पुन्हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला, लग्नसोहळेही लॉकडाऊन

Next

नाशिक : शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध आणखी वाढविण्यात आले असून, बुधवार (दि. १२)पासून प्रशासनाकडून शहरात टा‌‌ळेबंदीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत शुक्रवारी (दि. १४) अक्षय तृतीया असल्याने सलग दुसऱ्या वर्षी नाशिकच्या बाजारपेठेत ग्राहक आणि व्यावसायिकांचाही मुहूर्त चुकणार असून, शहरातील विवाह सोहळेही लॉकडाऊन झाले आहेत. अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने यादिवशी कोणतेही शुभ काम करण्यास नागरिक प्राधान्य देतात. विशेष म्हणजे या मुहूर्तावर विवाह बंधनात अडकणाऱ्या जोडप्यांचीही संख्या मोठी असते. विवाहाचे मुहूर्त अधिक असल्याने या काळात बाजारपेठेतही उत्साह संचारलेला असतो. या मुहूर्तावर साेने, वाहन, घर व गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीला नाशिककरांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. त्याचप्रमाणे काहीजण नवीन उद्योग-व्यावसाय सुरू करतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे बाजारपेठेत कडक निर्बंध असल्याने सराफा व वाहन व्यावसायिकांसह अन्य व्यावसायिकांनाही मोठा फटका बसणार आहे. शासनाने बाजारपेठेत लागू केलेल्या निर्बंधांमुळे सराफा पेढ्या बंद राहणार असल्याने या मुहूर्तावर बुक झालेल्या तसेच लग्नसराईकरिता घेतलेल्या दागिन्यांच्या ऑर्डर्स कशा पूर्ण करायच्या, या विवंचनेत व्यावसायिक आहेत. शहरात या व्यवसायावर किमान पाच ते सात हजार बंगाली कारागीर उदरनिर्वाह करतात. त्यामुळे आता त्यांना सराफा बाजारात काम करता येणार का? याचीही चिंता सतावत आहे. गतवर्षीही काेराेनामुळे अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकल्याने सराफा व्यावसायिकांचे माेठे नुकसान झाले हाेते. हीच परिस्थिती वाहन विक्रेत्यांचीही आहे. दरम्यान, नाशिकमध्ये कोणत्याही मूहूर्तावर सुमारे सातशे ते साडेसातशे चारचाकी, तर दीड हजाराहून अधिक दुचाकी वाहनांची विक्री होते. मात्र, कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही या व्यवसायाला फटका बसणार आहे. खास अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधण्यासाठी वाहने बुक करणाऱ्या ग्राहकांनाही वेळेत डिलिव्हरी देऊ शकणार की नाही, याविषयी व्यावसायिकांसमोर प्रश्न निर्माण झाले आहेत.

मे महिन्यात मुहूर्त

मे महिन्यात १६ विवाहांचे मुहूर्त असून, सुमारे ११ साखरपुड्यांचे मुहूर्त आहेत. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने शहर व जिल्ह्यातील अनेक विवाह पुढे ढकलण्यात आले आहेत.

--

यंदा कर्तव्य नाही.

निर्बंधांमुळे मुलाचे लग्न दोनवेळा पुढे ढकलले. मे महिन्यात परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा होती. परंतु, आता लॉकाडाऊन सुरू झाल्याने पुन्हा लग्न पुढे ढकलण्याची वेळ आली आहे.

गोविंद यादव, वर पिता

--

मुलीचे लग्न एप्रिल महिन्यात निश्चित झाले होते. लॉन्स व इतर तयारीही पूर्ण झाली होती. परंतु, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे निर्बंध आल्याने विवाह सोहळा रद्द करून घरीच साध्या पद्धतीने विवाह सोहळा उरकून घेतला.

- राजाराम जाधव, वधू पिता

---

मंगल कार्यालयांचे गणित बिघडले.

- २८ मार्च २०२०पासून टाळेबंदीमुळे लॉन्स व मंगल कार्यालयांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला असून, या व्यावसायिकांना १३ ते १४ महिन्यांत तब्बल ५०० कोटी रुपयांचा फटका बसल्याने या व्यवसायाचे गणित बिघडले आहे.

- लॉन्स व मंगल कार्यालयांमध्ये काम करणारे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही मोठ्या व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांना मदत देऊ केली असली, तरी हा हंगामी स्वरुपाचा व्यवसाय असल्याने अनेकांचा रोजगार बुडाला आहे.

- विवाह सोहळ्यांवर लॉन्स व मंगल कार्यालयांसह केटरर्स, फोटोग्राफर, डेकोरेटर्स, इव्हेंट मॅनेजमेंट, बँड पथक, किराणा आदी विविध व्यवसाय अवलंबून आहेत. त्यांचेही अर्थचक्र कोलमडले आहे.

- विवाह सोहळ्यांतील भोजन व्यवस्थेमुळे भाजीपाला व सजावटीसाठी फुलांनाही मागणी वाढते. परंतु, विवाह सोहळेच पुढे ढकलले जात असल्याने किंवा साध्या पद्धतीने होत असल्याने भाजीपाला आणि फुलांनाही मागणी घटली आहे.

Web Title: Akshay Tritiya's moment was missed again, wedding ceremony was also locked down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.