आला हजरत स्मृतिदिन : जुलूसमध्ये शेकडो मुस्लीम बांधव सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 05:30 PM2019-10-27T17:30:01+5:302019-10-27T17:32:21+5:30
इस्लामचे थोर अभ्यासक व धार्मिक साहित्यकार आला हजरत यांनी समाजाला दिशा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुराण व हदीसला अनुसरून दर्जेदार लिखाण केले आहेत.
नाशिक : इस्लाम धर्माचे ज्येष्ठ धर्मगुरू हजरत इमाम अहमद रजा उर्फ आला हजरत यांच्या १०१व्या स्मृतिदिनानिमित्त जुने नाशिक परिसरातून मिरवणूक (जुलूस) काढण्यात आली. मिरवणूकीत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. तसेच विविध मशिदींमध्ये धार्मिक कार्यक्रम पार पडले.
इस्लामचे थोर अभ्यासक व धार्मिक साहित्यकार आला हजरत यांनी समाजाला दिशा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुराण व हदीसला अनुसरून दर्जेदार लिखाण केले आहेत. त्यांच्या लिखाणातून समाजाला आजही प्रेरणा मिळते. दरवर्षी आला हजरत यांचा स्मृतिदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही मागील दोन दिवसांपासून शहरातील विविध मशिदींमध्ये ‘उरूस-ए-आला हजरत’चा कार्यक्रम पार पडला.
दरम्यान, शहर ए खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली जुने नाशिक परिसरातून सकाळी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत मोठ्या संख्येने समाजबांधव तसेच मदरसा सादिकुल उलूम, गौस-ए-आजमचे विद्यार्थी पारंपरिक पोशाख परिधान करून सहभागी झाले होते. सहभागी मंडळांकडून आला हजरत यांच्यावर अधारित विविध काव्यपंक्तीचे पठण केले जात होते. मिरवणूकीच्या अग्रभागी नुरी अकादमीचे हाजी सय्यद वसीम पिरजादा, रजा अकादमीचे एजाज रझा मकरानी, मौलाना मुफ्ती महेबुब आलम, मौलाना कारी रईस, मौलाना हाफीज जमाल, मौलाना अजहर, मौलाना वासिक रजा, मौलाना शमशोद्दीन मिस्बाही आदि धर्मगुरू उपस्थित होते. जमात-ए-रझा मुस्तुफा, दावत-ए-इस्लामी, सुन्नी दावत-ए-इस्लामी, शाह सादिक अकादमी या संघटनांचे प्रचारक तसेच इमाम अहमद रजा लर्निंग सेंटरचे पदाधिकारी मिरवणूकीत सहभागी झाले होते.
उच्च शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग
आला हजरत यांनी उच्च शिक्षणाच्या जोरावर आपल्या ज्ञानाच्या अधारे समाजाला दिशा दाखविणाऱ्या साहित्याची निर्मिती केली. त्यामुळे समाजाने त्यांच्या साहित्यातून उच्चशिक्षणाचा मुलमंत्र लक्षात घेत भावी पिढीला सुसंस्कार द्यावे तसेच उच्चशिक्षणासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन यावेळी हिसामुद्दीन खतीब, वसीम पिरजादा आदिंनी बडी दर्गातील मंचावरून समारोपप्रसंगी बोलताना केले.