‘बम बम भोले’चा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 01:16 AM2018-02-14T01:16:37+5:302018-02-14T01:18:30+5:30
नाशिक : हर हर महादेव... जय भोले... बम बम भोलेचा गजर करत शेकडो भाविकांनी शहरातील भगवान शंकर अर्थात महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. विविध धार्मिक कार्यक्रमांनी पारंपरिक पद्धतीने महाशिवरात्री सर्वत्र साजरी झाली.
शिवरात्र दरमहा येते; मात्र माघ कृष्ण चतुर्दशीला साजरी होणारी शिवरात्र धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्वाची मानली जाते. या रात्रीला महाशिवरात्र नावाने संबोधले जाते. सार्वजनिक सुटी असलेल्या या दिवसाचे हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. देवांचे देव महादेव यांचा हा दिवस कुटुंबातील सर्वच जण उपवास करतात. भगवान शंकराचे स्मरण करीत महादेव मंदिरामध्ये जाऊन शिवपिंडीवर बेलपुष्प अर्पण करून दुधाचा अभिषेक भाविकांकडून केला गेला.
भगवान शिवशंकराची आराधना करीत महाशिवरात्रीच्या व्रताची दुसºया दिवशी बुधवारी (दि.१३) सांगता शिवभक्तांकडून केली जाणार आहे. उत्तर भारतात महाशिवरात्र फाल्गून महिन्यात साजरी होते. पृथ्वीच्या निर्मितीप्रसंगी भगवान शंकरांनी याच तिथीला मध्यरात्री रौद्ररूप धारण केले होते, अशी मान्यता आहे. सोमेश्वरला ‘ताल नम: शिवाय’सोमेश्वर मंदिरात महाशिवरात्रनिमित्त सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. मंदिरात विश्वस्त मंडळाकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी १०८ बाल तबलावादकांनी सामूहिकरीत्या तबलावादन करत ‘ताल नम:शिवाय’ सादर केला. सुमारे तासभर चाललेल्या या तबलावादनाने सोमेश्वर मंदिर परिसर गुंजला होता.