क्षयरोगींना औषधांसाठी अलार्म करणार अलर्ट
By admin | Published: June 23, 2017 12:24 AM2017-06-23T00:24:22+5:302017-06-23T00:24:54+5:30
नाशिक : क्षयरोगींनी औषधे वेळच्या वेळी घ्यावीत याकरिता त्यांना अलर्ट करणारी अलार्म सिस्टम टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमार्फत विकसित केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : क्षयरोगींनी औषधे वेळच्या वेळी घ्यावीत याकरिता त्यांना अलर्ट करणारी अलार्म सिस्टम टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमार्फत विकसित केली जात असून, यापुढे क्षयरोगींवर डॉट पद्धतीद्वारे औषधोपचार एक दिवसाआडऐवजी दररोज केले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, केंद्र सरकारच्या पथकाने शहरातील क्षयरोग उपचार केंद्रांना भेटी देत पाहणी करत काही सूचना वैद्यकीय विभागाला केल्या.
केंद्र सरकारच्या क्षयरोग विभागामार्फत पथकाने दि. २१ व २२ जून रोजी शहरातील क्षयरोग उपचार केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. या पथकामध्ये आठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. क्षयरोगविषयक उपचार पद्धतींची योग्यप्रकारे अंमलबजावणी होते किंवा नाही, हा या पाहणीमागचा उद्देश होता. यावेळी पथकाने वैद्यकीय विभागाला विविध सूचना केल्या. यापुढे डॉट उपचार पद्धतीअंतर्गत क्षयरोगींवर दररोज औषधोपचार केले जाणार आहेत. तसेच खासगी डॉक्टरांनीही क्षयरोगी शोधायचे असून, त्यांना जागेवर उपचार करायचे आहेत. त्याबाबतचे रिपोर्टिंगही त्यांनी महापालिकेकडे करायचे आहे. त्यासाठी औषधे शासन विनामूल्य उपलब्ध करून देणार आहेत. गरज भासल्यास क्षयरोगींवर मनपाच्या रुग्णालयासह जिल्हा शासकीय रुग्णालयातही पुढील उपचार केले जाणार आहेत. क्षयरोगींच्या उपचारपद्धतीबाबत जागृती करण्यात यावी. त्यात खंड पाडता कामा नये. ज्यांना क्षयरोगाची लागण झाली आहे त्यांना उपचाराखाली आणावे, आदी सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, पाहणी पथकाने कथडा रुग्णालयात क्षयरोगाचे निदान होण्यासाठी बसविलेल्या सीबीनेट मशीनचीही पाहणी केली. यावेळी टीसीएसमार्फत क्षयरोगींना औषधे घेण्यासाठी अलर्ट करणारी अलार्म सिस्टम विकसित केली जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. डेकाटे यांनी दिली. पथकाने या संशोधनाची प्रशंसा केली.