देवळा तालुक्यातील वाजगाव ग्रामसभेत मद्यपींचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 05:35 PM2018-08-14T17:35:32+5:302018-08-14T17:36:36+5:30
ग्रामस्थ त्रस्त : यापुढे मद्यपींना ग्रामसभेत मनाई करण्याचा ठराव
देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे झालेल्या ग्रामसभेत मद्यपींनी केलेल्या गोंधळामुळे सभेच्या कामकाजात वारंवार अडथळा निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले. अखेर यापुढे ग्रामसभेत मद्यपींना प्रवेश देऊ नये, असा ठराव सर्वानुमते करण्यात आला.
येथील मारूती मंदिरात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश मोहन होते. ग्रामसभेस महिला व पुरूषांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मंदिराचा सभामंडप व प्रांगण गर्दीने भरून गेले होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. घरकुल योजनेबाबत लाभार्थींनी तक्ररी केल्या, त्यात दोन तीन मद्यपी गोंधळ घालून सभेत वारंवार अडथळा आणत होते. यामुळे सर्व जण त्रस्त झाले. हया मद्यपींचा बंदोबस्त करण्याची मागणी सुनील देवरे यांनी केली. वाजगाव येथे तलाठी सजा नसल्यामुळे शेतकऱ्यांना मटाणा येथे तलाठी कार्यालयात कामकाजासाठी जावे लागते, यामुळे गैरसोय होते. वाजगाव येथे आठवडयातून दोन दिवस तलाठी देण्यात यावा अशी मागणी संदीप देवरे यांनी केली. वडाळा कनकापूर रस्त्यावर अडथळा करणारी काटेरी झुडपे काढण्यात यावी व वडाळे येथे व्यायामशाळा बांधावी अशी मागणी वाल्मिक केदारे यांनी केली. भारत निर्माण योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीतून गावाचा पाणीपुरवठा सुरू करून योजना कार्यान्वित करावी, तसेच ग्रामपंचायतीची विकासकामे गावातील स्वयंरोजगार बेरोजगार संस्थाना देण्यात यावी अशी मागणी देवरे यांनी केली असता यावर चर्चा होउन प्रायोगिक तत्वावर कामाची मागणी करणा-या संस्थांना कामे देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. कोलतेवाडी ते वाजगाव रस्त्याची मागणी दिपक देवरे यांनी केली. गावातील काही ग्रामस्थ आपल्या शौचालयांचे सांडपाणी कोलती नदीपात्रात सोडून देतात, यामुळे प्रदूषण व अस्वच्छता निर्माण होते, यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करण्याची मागणी प्रमोद पवार यांनी केली.आदिवासी वस्तीत नवीन मोटार टाकण्यात यावी, स्मशानभूमी, आदिवासी वस्तीला तारेचे कुंपन व साफसफाई करण्यात यावी,वाजगाव मटाणे रस्त्यावरील काटेरी झुडपे काढणे मागण्या ग्रामस्थांनी केल्या. ग्रामसेवक जे.व्ही. देवरे यांनी आभार मानले.
यावेळी उपसरपंच बापू देवरे, ग्रामपंचायत सदस्या , निवृत्ति माळी, ज्ञानेश्वर मोहन, सुनिल देवरे, राजेंद्र केदारे, विलास सोनवणे, बबन नेहे, अमोल देवरे, आत्माराम देवरे, अतुल देवरे, बाळू बैरागी, हिरामण देवरे, गोकुळ कांबळे, हेमंत देवरे, मुंजाराम पवार आदींसह आंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.