मद्यसाठ्यावर डल्ला मारणारे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:17 AM2021-05-25T04:17:19+5:302021-05-25T04:17:19+5:30

नाशिक : नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील लोहिया कम्पाउंडमधील राजस्थान लिकर नावाच्या कंपनीच्या गोदामात दरोडा टाकून सुमारे २७ लाख ...

Alcohol addicts arrested | मद्यसाठ्यावर डल्ला मारणारे ताब्यात

मद्यसाठ्यावर डल्ला मारणारे ताब्यात

Next

नाशिक : नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील लोहिया कम्पाउंडमधील राजस्थान लिकर नावाच्या कंपनीच्या गोदामात दरोडा टाकून सुमारे २७ लाख रुपयांचा मद्यसाठा लुटून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोघांच्या गुन्हे शाखांच्या पथकांनी मुसक्या आवळल्या.

९ मे रोजी एका टोळक्याने लोहिया कम्पाउंडमधील गोदामाच्या सुरक्षारक्षकाचे हात-पाय व तोंड बांधून शस्त्राचा धाक दाखवत तेथील २६ लाख ९४ हजार २०३ रुपयांचा मद्यसाठा आयशर टेम्पोतून लांबविल्याची घटना घडली होती. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार गुन्हे शाखेचे युनिट-१ व २च्या पथकांनी समांतर तपास सुरू केला. पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा जालनापर्यंत माग काढला. तेथून मुख्य संशयित मुख्तार अहमद शेख (३५, रा. जम्मू काश्मीर) नावाच्या सराईत गुन्हेगाराला अटक केली. त्याची कसून चौकशी करत पोलिसांनी २३ लाख ३२ हजार ७२० रुपयांचा दडवून ठेवलेला मद्यसाठा हस्तगत केला.

त्याने दिलेल्या माहितीवरून गुन्ह्यातील त्याचा साथीदार संशयित शंकर मंजू गौडा (४४, रा. कर्नाटक) याच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या. मुख्तार हा सराईत गुन्हेगार असून मुंबईच्या एका गुन्ह्यात त्यास न्यायालयाने आठ वर्षांचा तुरुंगवास दिला होता. मुंबई व नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात सहा वर्षे शिक्षा भोगून तो जामिनावर सुटला होता. त्यानंतर कारागृहात हजर न होता पुन्हा गुन्ह्यांकडे वळला. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने नवी मुंबई, पुणे येथे तपास करून गुन्ह्यात वापरलेला आयशर ट्रक (एम.एच. ४३ बीजी ६७४८) व स्कॉर्पिओ जीप (एमएच ०२ एमसी २७९३) आणि आल्टो कार (एमएच १२ एफएफ १२७८) अशी सुमारे २० लाखांची वाहने जप्त करण्यात आली आहे. आल्टो कार ट्रकच्या पाठीमागे वॉच करण्यासाठी गुन्हेगार वापरत होते, असे पोलिसांनी सांगितले.

चोरलेला मद्यसाठ्याची विल्हेवाट लावणारा संशयित शंकर गौडा यास ताब्यात घेतले. इतर फरार संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस आयुक्त दीपक पांडेय, उपआयुक्त संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, अजय शिंदे, वसंत खतीले, महेश कुलकर्णी, श्रीराम कुलकर्णी, सहायक उपनिरीक्षक श्यामराव भोसले, रवींद्र बागुल, पोलीस अंमलदार नाझीम पठाण आदींच्या पथकाने या गुन्ह्याचा कौशल्याने तपास करीत छडा लावला.

Web Title: Alcohol addicts arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.