दारू दुकानाची जाळपोळ

By admin | Published: April 23, 2017 01:05 AM2017-04-23T01:05:22+5:302017-04-23T01:05:33+5:30

सटाणा : देशी दारू दुकान हटविण्यासाठी प्रशासनाने दुर्लक्ष करून कारवाई न केल्याने रणरागिणींनी हल्लाबोल करून तोडफोड करत दुकान जाळून टाकले.

Alcohol shop fire | दारू दुकानाची जाळपोळ

दारू दुकानाची जाळपोळ

Next

सटाणा : गावालगत असलेले देशी दारू दुकान हटविण्यासाठी वेळोवेळी ग्रामसभा घेऊनही प्रशासनाने दुर्लक्ष करून कारवाई न केल्याने संतप्त झालेल्या दीडशे ते दोनशे रणरागिणींनी हल्लाबोल करून तोडफोड करत दुकान जाळून टाकले. त्यानंतर जमाव काबूत आणणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि दुकानचालक-मालकावर संतप्त महिला अक्षरश: तुटून पडल्याने पोलीस अधिकाऱ्यांसह चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मळगाव येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
सटाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर अडीच हजार लोकवस्ती असलेले मळगाव वसले आहे. आरम नदीकिनाऱ्यावरील या गावालगत नदीपात्रात गेल्या अनेक वर्षांपासून देशी दारूचे दुकान आहे. या दुकानामुळे तळीरामांचा उपद्रव वाढून महिलांची छेडछाड काढण्याचे प्रकार राजरोज सुरू झाले होते. या वाढत्या प्रकारामुळे महिलांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली होती. यामुळे ग्रामस्थांनीही पुढाकार घेऊन वेळोवेळी ग्रामसभा बोलावून दारू दुकान हटविण्याचा ठराव केला होता. याबाबत अनेकवेळा पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने शनिवारी सकाळी अखेर रणरागिणींच्या सहनशीलतेचा बांधच फुटला.
सुमारे दीडशे ते दोनशे महिला या दुकानावर चाल करून आल्या. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास संतप्त महिलांनी लाठ्याकाठ्या घेऊन दारू दुकानावरच हल्ला करत दुकानाची तोडफोड केली. त्यानंतर एका पक्षाच्या तळीराम कार्यकर्त्याने महिलांना शिवीगाळ करत अरेरावी करून लागल्याने व दारूने भरलेल्या बाटल्या खिशात घालण्याचा प्रयत्न केल्याने जमाव अधिकच संतप्त झाला आणि दुकानालाच आग लावून दिली. दुकानात मोठ्या प्रमाणात दारू साठा असल्याने क्षणार्धात दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. (वार्ताहर)

Web Title: Alcohol shop fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.