हिरावाडीतील जॉगिंग ट्रॅक बनला मद्यपींचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:08 AM2019-11-21T00:08:21+5:302019-11-21T00:08:40+5:30
हिरावाडीतील प्रभाग क्रमांक ३ मध्ये स्व. मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलजवळ पाण्याच्या पाटालगत मनपा प्रशासने लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर पुन्हा मद्यपींचा सुळसुळाट वाढला आहे.
पंचवटी : हिरावाडीतील प्रभाग क्रमांक ३ मध्ये स्व. मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलजवळ पाण्याच्या पाटालगत मनपा प्रशासने लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर पुन्हा मद्यपींचा सुळसुळाट वाढला आहे. जॉगिंग ट्रॅकवर सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सकाळी पडलेल्या मद्याच्या बाटल्या व शेव-चिवड्याचे दर्शन घ्यावे लागते. त्यामुळे ट्रॅकवर सकाळी फिरण्यासाठी येणाºया जॉगर्सने तीव्र नाराजी व्यक्त करत मद्यपान करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
मनपाने पाटालगत जॉगिंग ट्रॅक तयार केला असून, अंदाजे एक किमी लांब असलेल्या ट्रॅकवर परिसरातील मुले, मुली, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक दैनंदिन सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी येतात. सकाळी ट्रॅकवरून फिरताना ट्रॅकवर मध्यभागी पडलेल्या रिकाम्या दारूच्या बाटल्या, शेव-चिवडा, सिगारेटची पाकिटे यांचे दर्शन घ्यावे लागते. परिसरातील काही मद्यपी टोळके रात्रीच्या सुमाराला ट्रॅकवर ठाण मांडून मद्य प्राशन करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जॉगिंग ट्रॅक झाल्याने त्याचा नागरिकांना फायदा झाला खरा, मात्र सध्या ट्रॅकवर परिसरात राहणाºया टवाळखोर व मद्यपींची वक्रदृष्टी पडल्याचे दिसून येते. ट्रॅकच्या बाजूला रोज मद्याच्या बाटल्या, ग्लास फेकल्याचे आढळून येते. मनपा प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी जॉगिंग ट्रॅक तयार केला असला तरी, त्याचा रात्रीच्या वेळी होणारा गैरवापर रोखण्याची कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे आता मद्यपींवर पंचवटी पोलिसांकडून वेळीच कठोर कारवाईची अपेक्षा नागरिकांनी केली आहे.
दुखापत होण्याची शक्यता
महापालिका प्रशासनाने ट्रॅक तयार केलेला असला तरी अद्याप विद्युत व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिकांना अंधारातच ये-जा करावी लागते. त्यातच मद्यपी रिकाम्या बाटल्या ट्रॅकवर फेकत असल्याने नागरिकांच्या पायाला लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर विद्युत व्यवस्था करावी.
- अर्जुन टाकळकर, ज्येष्ठ नागरिक