दारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 06:33 PM2019-07-30T18:33:47+5:302019-07-30T18:35:52+5:30
गेल्या चार दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे दारणा धरणाच्या पाण्याची पातळी ८७ टक्क्यापेक्षा अधिक वाढली आहे. त्यातच नाशिक तालुक्यात दारणाकाठच्या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने नदी, नाले तुडुंब भरून वाहत
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : पावसाची संततधार सुरू असल्याने दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाल्याने धरणातून दुसऱ्या दिवशीही १३ हजारांहून अधिक क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भगूर-इगतपुरी दरम्यानच्या शेणीत येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याने सोमवारी सायंकाळी बंद करण्यात आलेली वाहतूक मंगळवारी पूर्ववत सुरू करण्यात आली.
गेल्या चार दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे दारणा धरणाच्या पाण्याची पातळी ८७ टक्क्यापेक्षा अधिक वाढली आहे. त्यातच नाशिक तालुक्यात दारणाकाठच्या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. धरणाचा धोका टाळण्यासाठी सोमवारी दुपारपासून धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे दारणा नदीला पूर आला असून, सोमवारी सायंकाळनंतर भगूर-इगतपुरी मार्गावरील शेणीत जवळील पुलावरून पाणी वाहू लागल्याने पोलीस पाटील यांनी पोलीस प्रशासनाला माहिती दिल्यानंतर तातडीने पुलावर बंदोबस्त तैनात करण्यात आला. या मार्गावरील वाहतूक बंद झाल्यामुळे भगूरहुन इगतपुरीकडे जाणा-या सुमारे पंचवीस खेड्यांची वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पांढुर्ली मार्गे राष्ट्रीय महामार्गाचा वापर करत घोटी मार्गाने जावे लागले.
गेल्या चार वर्षांनंतर या पुलावरून पाणी गेल्याने आजूबाजूच्या शेतांमध्येही पाणी घुसले व चालू पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय दारणाकाठच्या साकूर, लोहशिंगवे, वंजारवाडी, भगूर, राहुरी, दोनवाडे, बेलतगव्हाण, नानेगाव या गावांच्या स्मशानभूमींना पाण्याने वेढा दिला आहे. तर नदीकाठची मंदिरे पाण्यात बुडाली आहेत. मंगळवारी दुपारनंतर पावसाने काहीकाळ विश्रांती घेतल्याने सकाळपासूनच शेणीत पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र दारणा नदीचा पूर कायम आहे.