नदीकाठी राहणाऱ्यांना मनपाचे सतर्कतचा इशारा
By Suyog.joshi | Published: August 4, 2024 07:09 PM2024-08-04T19:09:37+5:302024-08-04T19:09:55+5:30
नाशिक (सुयोग जोशी) : पावसाचा जोर वाढत असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. तो टप्प्याटप्प्याने वाढणार असल्यामुळे नदीकाठी ...
नाशिक (सुयोग जोशी) : पावसाचा जोर वाढत असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. तो टप्प्याटप्प्याने वाढणार असल्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. पूर बघण्यासाठी नागरिकांनी नदीकिनारी गर्दी करू नये. कुठलाही धोका पत्करू नये असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने नागरिकांना करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास ०२५३२५७१८७२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त तथा आपत्कालीन विभाग प्रमुख स्मिता झगडे यांनी केले आहे. वालदेवी, नंदिनी किनारीही पुर बघायला आलेल्या नागरिकांना बाजूला करण्यात येत होते. याकामी मनपाचे सहाही विभागीय अधिकारी दिवसभर त्यांच्या त्यांच्या विभागात उपस्थित राहून संबधित कर्मचाऱ्यांना आदेशित करत होते.
आपत्कालिन परिस्थिती उदभवल्यास येथे संपर्क करा
१) मुख्य आपत्ती कक्ष, राजीव गांधी भवन-०२५३-२३१७५०५
२) पंचवटी विभागीय कार्यालय : ०२५३-२५१३४९०
३) सातपूर विभागीय कार्यालय-०२५३-२३५०३६७
४) नाशिक पूर्व विभागीय कार्यालय, मेनरोड-०२५३-२५०४२३३
५) नाशिक पश्चिम विभागीय कार्यालय, पंडित कॉलनी-०२५३-२५७०४९३
६) सिडको विभागीय कार्यालय-०२५३-२३९२०१०
७) नाशिकरोड विभागीय कार्यालय-०२५३-२४६०२३४
श्रमिकनगरला घरात शिरले पावसाचे पाणी
नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक ९ मध्ये श्रमिकनगर येथील नरेंद्रचार्य महाराज उद्यान समोर नागरिकांच्या घरामध्ये रात्री दीड वाजेच्या सुमारास घरात पावसाचे पाणी गेले होते. त्यामुळे नागरिकांचे खूप हाल झाले. रात्रीच्या वेळी घरात पाणी शिरल्याने सर्व नागरिक जागे झाले. अनेकांना दुसऱ्या ठिकाणी जाऊन थांबावे लागले. तिथल्या नागरिकांनी रात्री फायर ब्रिगेड,बांधकाम विभाग, महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यामुळे त्या ठिकाणी चार वाजेपर्यंत पाण्याचा निपटारा केला. त्यामुळे पुढचा धोका टळला.