शहरातील सिग्नलवर अॅलर्ट सायरन
By admin | Published: March 22, 2017 03:03 PM2017-03-22T15:03:46+5:302017-03-22T15:03:46+5:30
महापालिकेने पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडताना सिग्नल सुटण्याच्या आगोदर तत्काळ मार्गस्थ व्हावे, यासाठी शहरातील सिग्नलवर अॅलर्ट सायरन बसविले आहे.
नाशिक : शहरातील वाहतूकीला शिस्त लागावी आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी स्वत: पुढाकार घेत शहर वाहतूक शाखेला विविध सुचना दिल्या आहेत. महापालिकेच्या माध्यमातून अकरा नवीन ठिकाणी सिग्नल लावण्याचाही प्रस्ताव तयार केला जात आहे. सिंगल यांनी नुकतीच नवनिर्वाचित महापौर रंजना भानसी यांच्याशी शहर वाहतुक आणि सिग्नलची गरज या विषयावर चर्चा केली. दरम्यान, महापालिकेने पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडताना सिग्नल सुटण्याच्या आगोदर तत्काळ मार्गस्थ व्हावे, यासाठी शहरातील सिग्नलवर अॅलर्ट सायरन बसविले आहे. सिग्नल सुटण्यास अवघे पाच ते आठ सेकंद शिल्लक राहिले असता हा सायरन वाजतो. त्याचाच अर्थ पादचाऱ्यांनी आता रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करु नये, सिग्नल हिरवा होणार असून वाहतूक सुरू होईल. यामुळे आहे त्या ठिकाणी सुरक्षित थांबावे व पुन्हा सिग्नल लाल होण्याची प्रतिक्षा करावी असा होतो. यामुळे सिग्नलवर पादचाऱ्यांचे रस्ता ओलांडताना होणारे अपघात टळण्यास मदत होणार आहे. शहरातील बहुतांश सिग्नलवर असे सायरन बसविले जात आहे. सर्वप्रथम सावरकर तलाव सिग्नलवर हा सायरन बसविण्यात आला. त्यानंतर सीबीएस, मेहेर, कॅनडा कॉर्नर, जुना गंगापूरनाका या सिग्नलवर देखील अशा प्रकारचा सावधान करणारा सायरन बसविण्यात आला आहे. प्रत्येक सिग्नलवर एक याप्रमाणे सायरन बसविण्यात येत आहे.