अलीअकबर व वाडया रूग्णालयाची इमारत पाडण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 00:44 IST2021-07-08T23:41:03+5:302021-07-09T00:44:53+5:30
मालेगाव : महापालिकेच्या वाडिया व अलीअकबर रुग्णालयाच्या जुन्या इमारती पाडून या ठिकाणी व्यापारी गाळे उभारण्याचा घाट सत्ताधारी व प्रशासनाकडून केला जात असल्याचा आरोप करत एमआयएमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते.

मालेगाव महापालिकेत आंदोलन करताना एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेझ व महिला.
मालेगाव : महापालिकेच्या वाडिया व अलीअकबर रुग्णालयाच्या जुन्या इमारती पाडून या ठिकाणी व्यापारी गाळे उभारण्याचा घाट सत्ताधारी व प्रशासनाकडून केला जात असल्याचा आरोप करत एमआयएमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते.
यावेळी महापालिकेचे उपायुक्त राहुल पाटील, शहर अभियंता कैलास बच्छाव यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये येणाऱ्या अली अकबर व वाडिया रुग्णालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. नवीन इमारतीची गरज नसताना ठेकेदारांच्या फायद्यासाठी इमारत बांधण्याचा घाट रचला जात आहे. इमारत बांधकामाच्या नावाखाली व्यापारीगाळे उभारले जाणार आहे. नांदेडी हायस्कूल व मदनीनगर, जाफरनगर येथे रुग्णालयाच्या इमारती तयार आहेत; मात्र या ठिकाणी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जात नाही. सुविधा पुरविण्याऐवजी जुन्या इमारती पाडल्या जात आहेत. वाडिया व अलीअकबर रुग्णालय महिला व लहान मुलांसाठी सुरू ठेवावेत, अशी मागणी एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज टाऊन हॉलची इमारत पाडली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी एमआयएम कायम रस्त्यावर उतरेल, असा इशारा एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेझ यांनी दिला. या आंदोलनात महिला व कार्यकर्ते सहभागी झाले होते.