नवजात बालकांसाठी आलीय न्युमोकोकल कॉन्जूगेट व्हॅक्सिन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:17 AM2021-07-14T04:17:23+5:302021-07-14T04:17:23+5:30
पेठ : ग्रामीण भागातील बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी तसेच एक वर्षांखालील बालकांना न्युमोकोकल या आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी न्युमोकोकल कॉन्जूगेट ...
पेठ : ग्रामीण भागातील बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी तसेच एक वर्षांखालील बालकांना न्युमोकोकल या आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी न्युमोकोकल कॉन्जूगेट व्हॅक्सिन ही नवीन लस तयार करण्यात आली आहे. पेठ येथील ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारपासून बालकांना ही लस उपलब्ध असणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे यांनी दिली.
जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावीत यांच्या उपस्थितीत या नवीन लसीकरण मोहिमेचा ग्रामीण रुग्णालय, पेठ येथे दीड महिन्याच्या बालकाला लस टोचून शुभारंभ करण्यात आला. यावेळी सभापती विलास अलबाड, नगराध्यक्ष मनोज घोंगे, तहसीलदार संदीप भोसले, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजित नाईक, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. विरेंद्र गावित, डॉ. अतुल देवरे, डॉ. संकेत माळी, तालुका आरोग्य सहाय्यक बाळासाहेब चौधरी आदी उपस्थित होते. या लसीचा पहिला डोस सहा आठवडयांच्या बालकाला दिला जाणार असून, १४ आठवड्यानंतर दुसरा डोस, तर
नऊ महिन्यांनंतर बुस्टर डोस देण्यात येणार असल्याने नागरिकांनी आपल्या बालकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
--------------------
पेठ येथील ग्रामीण रुग्णालयात बालकांना लसीकरण मोहीम शुभारंभप्रसंगी भास्कर गावीत, विलास अलबाड, मनोज घोंगे, संदीप भोसले, नम्रता जगताप, डॉ. योगेश मोरे आदी. (१३ पेठ १)
130721\13nsk_6_13072021_13.jpg
१३ पेठ १