येवला ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील सर्व विभाग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 05:37 PM2020-05-22T17:37:00+5:302020-05-22T17:37:42+5:30
गोरगरीब रुग्णांची थांबली गैरसोय
येवला : शहरासह तालुका कोरोनामुक्त झाल्याने स्थानिक प्रशासनासह आरोग्ययंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे शहरातील ग्रामीण उपजिल्हा रूग्णालयातील सर्व विभाग शुक्र वार (दि.२२) पासून नियमितपणे सुरू झाल्याने गोरगरीब रूग्णांची गैरसोय थांबली आहे.
येवल्यातील आरोग्ययंत्रणाच कोरोनाबाधित झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. मालेगाव कनेक्शन असणाऱ्या महिलेच्या संपर्कातून येवला ग्रामीण उपजिल्हा रूग्णालयातील दहा कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करून उपजिल्हा रूग्णालय सॅनीटायजेशन व विशेष स्वच्छतेसाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र, कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे रूग्णही ग्रामीण रूग्णालयात येण्यास धजावत नव्हते. आता, सर्वच कोरोनाबाधित औषधोपचाराने कोरोनामुक्त झाल्याने रूग्णालयातील सर्वच विभाग सुरू करण्यात आले आहेत.
दैनंदिन ओपीडी सुरू
येवला तालुक्यातील कोरोनाबाधित सर्व रु ग्ण औषधोपचाराने बरे झाले आहे. ग्रामीण उपजिल्हा रु ग्णालयातील दहा कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचे रिपोर्टही निगेटीव्ह आले असून कोरोनामुक्त झालेले सर्व कर्मचारी सेवेत रूजू झाले आहेत. ग्रामीण रु ग्णालयात दैनंदिन ओपीडी सुरू झाली आहे. प्रसृती विभाग, लसीकरण आदी सर्व विभागही सुरु झाले आहे. जनतेने शासकीय आरोग्य सुविधेचा लाभ येवला ग्रामीण रु ग्णालयातून घ्यावा.
- डॉ. शैलजा कुप्पास्वामी, वैद्यकीय अधिक्षक