मर्यादेत घेतल्यास मधुमेहींना सर्व आहार योग्यच : आदिती देशमाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:52 AM2020-02-17T00:52:24+5:302020-02-17T00:52:48+5:30
मधुमेह झालेल्या रुग्णांच्या मनात आहाराविषयी खूपच भीती असते. मात्र मधुमेह झालेले रुग्ण इतर सर्वसामान्यांप्रमाणे सर्वकाही खाऊ शकतात, फक्त ते खाताना त्याचे प्रमाण ठरवायला हवे, असे मत कोल्हापूर येथील आहारतज्ज्ञ डॉ. आदिती देशमाने यांनी राज्यस्तरीय मधुमेह संमेलनात रविवारी (दि.१६) आयोजित चर्चासत्रात व्यक्त केले.
नाशिक : मधुमेह झालेल्या रुग्णांच्या मनात आहाराविषयी खूपच भीती असते. मात्र मधुमेह झालेले रुग्ण इतर सर्वसामान्यांप्रमाणे सर्वकाही खाऊ शकतात, फक्त ते खाताना त्याचे प्रमाण ठरवायला हवे, असे मत कोल्हापूर येथील आहारतज्ज्ञ डॉ. आदिती देशमाने यांनी राज्यस्तरीय मधुमेह संमेलनात रविवारी (दि.१६) आयोजित चर्चासत्रात व्यक्त केले.
या चर्चासत्रात मधुमेह रुग्णांच्या आहाराविषयी चर्चा झाली. यावेळी डॉ. आदिती देशमाने म्हणाल्या, आहाराविषयी मधुमेहाचे रुग्ण वेगवेगळ्या शंका व्यक्त करतात. भात, भाकरी, दूध याविषयी त्यांच्या मनात वेगवेगळ्या शंका असतात. परंतु मधुमेहाचे रुग्णही सर्वकाही खाऊ शकतात. यासाठी आपली जीवनशैली, वजन, उंची यांचा विचार करून खायचे प्रमाण ठरवायला हवे.
तूप हा सिंग्ध पदार्थ आहे त्यामुळे त्यात प्रोटीन्स असतात. यामुळे अमुक एक प्रकारचेच तूप घ्यावे असे नाही तर कुठलेही तूप योग्य प्रमाणात घेतले तर ते चालते, असे त्या म्हणाल्या. यावेळी नागरिकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे त्यांनी समाधान केले. यानंतर संमेलनाचा समारोप झाला. समारोपप्रसंगी डॉ. नारायण देवगावकर, डॉ. वसंत कुमार, डॉ. समीर चंद्रात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. त्यानंतर संमेलनासाठी परिश्रम घेणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. तीन दिवस चाललेल्या या संमेलनात राज्यभरातील डॉक्टरांनी हजेरी लावली. समारोप सत्रानंतर नागरिकांसाठी शरद उपाध्ये यांच्या राशीचक्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कोरोना विषाणूबाबत दिली माहिती
मुंबई येथील डॉ. संदीप राय यांनी एका चर्चासत्रात कोरोना विषाणूबाबत माहिती दिली. कोरोना व्हायरस अद्याप भारतात पसरलेला नाही, मात्र तो पसरू नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी. ज्याला कोरोना झाला आहे त्याच्या शिंकेवाटे, खोकल्यामुळे विषाणू बाहेर पडतात व ते आपल्या आजूबाजूला साचतात. अशा वस्तूंशी आपला संपर्क आला व तेच हात आपल्या नाका-तोंडाला लागल्यास आपल्याला या विषाणूची लागण होऊ शकते. यासाठी दिवसातून पाच-सहा वेळा हात स्वच्छ धुवा, आपल्या परिसरात स्वच्छता पाळा असा सल्ला त्यांनी दिला.