खात्यातून गायब झालेले सव्वा लाख तासाभरात परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:19 PM2020-02-17T23:19:42+5:302020-02-18T00:18:19+5:30
तुमचे पेटीएम अॅपचे केवायसी अपडेट करावयाचे आहे, असे सांगून फोनवर एक लिंक पाठविण्यात आली. लिंक ओपन केल्यानंतर आलेला ओटीपी अज्ञात व्यक्तीस दिल्यानंतर खात्यातील एक लाख २३ हजार ८०० रुपये गायब झाल्याचा प्रकार सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील रमेश दत्तात्रय वाजे यांच्यावर बितला. मात्र नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी प्रसंगावधान राखून तासभरात तपासाची चक्रे फिरवून तक्रारदाराचे खात्यातून कमी झालेले एक लाख २३ हजार ८०० रुपये मिळवून देण्याची कामगिरी केली.
सिन्नर : तुमचे पेटीएम अॅपचे केवायसी अपडेट करावयाचे आहे, असे सांगून फोनवर एक लिंक पाठविण्यात आली. लिंक ओपन केल्यानंतर आलेला ओटीपी अज्ञात व्यक्तीस दिल्यानंतर खात्यातील एक लाख २३ हजार ८०० रुपये गायब झाल्याचा प्रकार सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील रमेश दत्तात्रय वाजे यांच्यावर बितला. मात्र नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी प्रसंगावधान राखून तासभरात तपासाची चक्रे फिरवून तक्रारदाराचे खात्यातून कमी झालेले एक लाख २३ हजार ८०० रुपये मिळवून देण्याची कामगिरी केली.
त्याचे झाले असे, सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील रमेश दत्तात्रय वाजे यांना फोनवरील अज्ञात व्यक्तीने तुमचे पेटीएम अॅपचे केवायसी अपडेट करावयाचे असून, त्याकरिता एक लिंक पाठवत असल्याचे सांगितले. वाजे यांच्या फोनवर एक लिंक आल्यानंतर लिंकवर क्लिक केल्यानंतर एक ओटीपी आला. फोनवरील अज्ञात व्यक्तीस ओटीपी दिल्यानंतर वाजे यांच्या खात्यातील एक लाख २३ हजार ८०० रुपये एचडीएफसी क्रेडिट कार्डवरून कमी झाल्याचा मेसेज आला.
खात्यावरील सुमारे सव्वा लाख रुपये कमी झाल्याचे पाहून वाजे यांना धक्काच बसला. आपली फसवणूक झाल्याचे कळल्यानंतर वाजे यांनी तातडीने नाशिक सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांच्याशी संपर्क साधला. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अनमुलवार, कर्मचारी प्रमोद जाधव, परिक्षित निकम यांनी तक्रारदार यांची तांत्रिक माहिती घेऊन संबंधित फ्लिपकार्ड नोटल यांच्यासोबत तत्काळ संपर्क साधून फसवणूक झालेल्या रकमेचे ट्रॉन्झॅक्शन थांबविण्यास सांगितले. त्यामुळे वाजे यांची फसवणूक होऊन खात्यातून कमी झालेली सुमारे सव्वा लाख रुपयांची रक्कम त्यांचे क्रेडिट कार्ड खात्यात परत मिळवून देण्यात सायबर पोलिसांना मोठे यश मिळाले. सायबर पोलिसांच्या कामगिरीबद्दल वाजे यांनी पोलीस अधीक्षक व सायबर पोलिसांच्या पथकाचा सत्कार करून आभार मानले.
अनोळखी फोन कॉल्सवर विश्वास ठेवून आपल्या बँक खात्याची
वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तीस देऊ नका. कोणतीही बँक अशा प्रकारची माहिती फोनद्वारे विचारत नाही. बॅँक खात्याविषयी माहितीकरिता संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन खात्री करावी. आपल्याबरोबर अशी कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास लागलीच जवळील पोलीस ठाणे किंवा सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
- सुभाष अनमुलवार, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, नाशिक