‘त्या’ खुनातील चौघांना बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 01:02 AM2019-12-10T01:02:42+5:302019-12-10T01:03:17+5:30
बहिणीशी प्रेमसंबंध ठेवल्याचा राग मनात धरून जुने नाशिकमधील डिंगरअळी संभाजी चौकात शनिवारी (दि.९) मध्यरात्री एका युवकाला धारधार शस्त्राने ठार मारणाऱ्या चौघांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.
नाशिक : बहिणीशी प्रेमसंबंध ठेवल्याचा राग मनात धरून जुने नाशिकमधील डिंगरअळी संभाजी चौकात शनिवारी (दि.९) मध्यरात्री एका युवकाला धारधार शस्त्राने ठार मारणाऱ्या चौघांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्ह्यानंतर रात्रीतूनच संशयित हल्लेखोर त्रिकुटांनी मुंबई गाठली होती, तर एक हल्लेखोर शहरातच पोलिसांच्या हाती लागला होता. या खुनाचे कारण केवळ पूर्ववैमनस्य असून, प्रथमदर्शनी तरी कुठल्याहीप्रकारचे टोळीयुद्ध दिसत नसल्याचे उपआयुक्त अमोल तांबे यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी, २०१६ साली पंचवटी कॉलेजसमोर राहुल टाक नावाच्या युवकाची गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली होती. त्या गुन्ह्याची आणि शनिवारी घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याची पार्श्वभूमी व कारण समान असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुशांतला पोलिसांनी जुन्या नाशकातच बेड्या ठोकल्या तर रविवारी पहाटे सहायक निरीक्षक राकेश हांडे, उपनिरीक्षक डी. बी. मोहिते, व्ही. एस. जोनवाल यांच्या पथकाने मुंबई येथून अन्य त्रिकुटांना ताब्यात घेतले. सुशांत वाबळे याच्या तडीपार प्रस्तावाची चौकशी सुरू असल्याची तांबे यांनी सांगितले. त्याला यापूर्वी नोटीसदेखील बजावण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी दिली. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या गुरुवारपर्यंत (दि.१२) पोलीस कोठडी सुनावली आहे.
गोळीबाराच्या गुन्ह्यात संशयित आरोपी सुशांत कैलास वाबळे (रा. म्हसरूळ टेक, जुने नाशिक) याचा या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला होता. तो या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला असताना त्याने पुन्हा संभाजी चौकात संशयित आरोपी शुभम उर्फ शंभू गोरख जाधव, शिवा गोरख जाधव (२०,दोघे रा. रा.जाधव वाडा, मरीटेक, जुनेनाशिक), भूषण जगदीश शिंदे (रा.हिरावाडी, पंचवटी) यांच्या मदतीने विवेक सुरेश शिंदे याचा धारधार शस्त्रांनी खून केला.