नाशिक-बेळगाव पाठोपाठ सर्वच विमानसेवा सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:11 AM2021-07-05T04:11:16+5:302021-07-05T04:11:16+5:30
कोरोनाच्या पहिल्या लाटेचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर नाशिकमधील विमानसेवांना मोठी गती मिळाली होती. विशेष रेल्वे बंद असल्यामुळे विमानसेवांना चांगला प्रतिसाद ...
कोरोनाच्या पहिल्या लाटेचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर नाशिकमधील विमानसेवांना मोठी गती मिळाली होती. विशेष रेल्वे बंद असल्यामुळे विमानसेवांना चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, फेब्रुवारीनंतर कोरोनाची दुसरी लाट तीव्र झाली. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून विमानसेवा बंद करण्यात आल्या. ट्रू जेटची नाशिक-अहमदाबाद ही सेवा गेल्या महिन्यात सुरू होती. मात्र, पुरेशा प्रवाशांअभावी ती बंद करावी लागली. त्यानंतर नाशिकमधील ओझर विमानतळावरून उडणारी सर्वच विमाने बंद होती. दरम्यान, स्टारएअरच्या नाशिक-बेळगाव सेवेला २ जुलैला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी ४२ प्रवाशांनी प्रवास केला. आता हळूहळू अन्य विमान कंपन्यादेखील सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ट्रू जेटची नाशिक- अहमदाबाद सेवा १५ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे, तर एअर लायन्सची नाशिक-अहमदाबाद, दिल्ली ही सेवा १२ जुलैपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
याशिवाय, याच कंपनीची नाशिक-पुणे- बेळगाव ही सेवाही लवकरच सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. स्पाइस जेट कंपनीची नाशिक-दिल्ली-हैदराबाद ही सेवा सुरू करण्याची तयारी असली, तरी सध्या केंद्र सरकारच्या निर्बंधांमुळे ५० टक्के विमानांना परवानगी देण्यात आल्यामुळे त्यांचा अंतिम निर्णय झालेला नसल्याचे समजते.
नाशिकमधील विमानसेवा किफायतशीर असल्याचे पटवून देण्यात विविध उद्योग संघटना आणि विशेषकरून उद्योजक मनीष रावल प्रयत्न करीत असल्याने विमानसेवा लवकर सुरू होण्याची चिन्हे आहेत.
कोट..
केंद्र शासनाने पन्नास टक्के विमाने उडविण्याची परवानगी दिली आहे. तसेच अन्य निर्बंध आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात विमान प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली तरी आरटीपीसीआर चाचणी करून निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक आहे. त्यामुळे काही प्रमाणात अडचणी असल्या तरी लवकरच बऱ्यापैकी सेवा सुरळीत होतील.
- मनीष रावळ, उद्योजक