गोदाकाठी राहणारे सारेच नाशिककर भाग्यवान - पं. प्रदीप मिश्रा
By Suyog.joshi | Published: November 21, 2023 07:31 PM2023-11-21T19:31:15+5:302023-11-21T19:31:24+5:30
महाशिवपुराण कथा सोहळ्यात गौरवोद्गार
नाशिक : प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शाने पूनित झालेल्या, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीचे पावित्र्य लाभलेल्या, सप्तश्रृंगी मातेने आशीर्वाद दिलेल्या आणि आद्य ज्योर्तिर्लिंग त्र्यंबकेश्वराच्या सान्निध्यात गोदाकाठी राहणारे सारेच नाशिकककर खरोखरच भाग्यवान असल्याचे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय कथाकार भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांनी काढले. पाथर्डी गाव परिसरात पं. मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेस मंगळवारी प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. दि. २५ नोव्हेंबरपर्यंत दुपारी २ ते ५ या वेळेत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
कथा ऐकण्यासाठी विशेषत: उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागातून भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी बोलतांना पं. मिश्रा म्हणाले, संसारात केवळ सुखच महत्वाचे नाही, तर आपण दुसऱ्यासाठी काय करतो, देवाची किती सेवा करतो हे महत्वाचे आहे. आपल्याला मनुष्याचा जन्म मिळाला हे आपले भाग्य असून ते जीवन आपण कसे सार्थकी लावतो यासाठी देवासाठी आपण काही तरी केले पाहिजे, आणि हाच योग आता आला आहे. आपण सर्वांनी शिवपुराण कथेचा लाभ घेत धन्य व्हावे असे आवाहन पं. मिश्रा यांनी केले. राज्यभरातील भाविकांनी कथा ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने ठिकठिकाणी वाहतुक ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी बॅरिकेटिंग लावण्यात आल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागला.