आघाड्यांच्या राजकारणात सर्वच पक्षांकडून स्वबळ आजमावण्याचीही तयारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:15 AM2021-09-03T04:15:09+5:302021-09-03T04:15:09+5:30

भगवान गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्क दिंडोरी : कोरोनामुळे पुढे ढकललेली दिंडोरी नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक लवकरच होण्याची चिन्हे असून, राजकीय ...

All parties are ready to try their best in frontline politics! | आघाड्यांच्या राजकारणात सर्वच पक्षांकडून स्वबळ आजमावण्याचीही तयारी!

आघाड्यांच्या राजकारणात सर्वच पक्षांकडून स्वबळ आजमावण्याचीही तयारी!

googlenewsNext

भगवान गायकवाड

लोकमत न्यूज नेटवर्क

दिंडोरी : कोरोनामुळे पुढे ढकललेली दिंडोरी नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक लवकरच होण्याची चिन्हे असून, राजकीय जुळवाजुळव सुरू आहे. सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस व मनसे यांचे स्वबळाचे प्रयत्न असले तरी दिंडोरीचे राजकारण पक्षीयपेक्षाही व्यक्तिकेंद्रीत असल्याने येथे कोणत्या आघाड्यांची राजकीय समीकरणे जुळतात, हे प्रत्यक्ष निवडणूक रणधुमाळी सुरू होतानाच ठरणार आहे. स्वबळ आजमावले जाणार, महाविकास आघाडी होणार, की स्थानिक पातळीवर विकास आघाड्या करून निवडणुकीचा फड रंगणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादीने एकत्र येत बहुमत मिळवले होते. दिंडोरी नगर पंचायतीत पक्षीय बलाबलापेक्षा माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या गटाचा वरचष्मा राहिला आहे. सध्या नगरपंचायतीत काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असून, राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आहेत. राज्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचा प्रयोग स्थानिक पातळीवर राबविला गेला तरी त्यात माजी आमदार रामदास चारोस्कर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडी झाल्यास भाजपला आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

दिंडोरी नगरपंचायतीमध्ये काँग्रेसचे सात, राष्ट्रवादीचे तीन, शिवसेनेचे दोन, भाजपचा एक व अपक्ष चार नगरसेवक आहेत. त्यात सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सोबत शिवसेना व एक अपक्ष नगरसेवक आहेत, तर भाजपने स्वतंत्र गट केला आहे. त्यात तीन अपक्ष, काँग्रेस, भाजप व शिवसेनेचे प्रत्येकी एक नगरसेवक या विरोधी गटात आहेत. पहिली दोन वर्षे काँग्रेसचे भाऊसाहेब बोरस्ते नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष सचिन देशमुख होते. सहा महिने विरोधी गटाचे प्रमोद देशमुख यांनाही संधी देण्यात आली होती. उपनगराध्यक्ष आशाताई कराटे यांना संधी देण्यात आली होती. मुदत संपण्यापूर्वी अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या रचना जाधव नगराध्यक्ष, तर राष्ट्रवादीचे कैलास मवाळ उपनगराध्यक्ष होते. कोरोनामुळे निवडणूक लांबल्यामुळे सध्या प्रशासक आहेत. गेल्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीत काँग्रेसने जास्त जागा लढवल्याने सात जागा मिळवल्या होत्या. मात्र, त्यावेळी माजी आमदार रामदास चारोस्कर हे काँग्रेसमध्ये होते. आता ते शिवसेनेत आहेत. दरम्यान, त्यांच्याच भूमिकेवर आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.

गेल्या वेळी भाजप व शिवसेना दोघेही स्वतंत्र लढले. त्याचा फटका दोघांनाही बसला. भाजपला अवघी एक जागा मिळवता आली. मात्र, राज्यात भाजपचे सरकार आले. अपक्ष नगरसेवकांना सोबत घेत येथे भाजपने आपली संख्या वाढवली असून, भाजप या निवडणुकीत चांगली टक्कर देण्यासाठी सज्ज राहणार आहे. मात्र, ऐनवेळी काही समीकरणे जुळून आल्यास पुन्हा शहर विकास आघाडीचाही प्रयोग राबविला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनसेने गेल्यावेळी सुरुवातीला एक जागा जिंकली होती. यंदाही मनसे निवडणुकीत उतरणार असून ते स्वबळ आजमावतात, की कुणासोबत जातात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

कोट...

दिंडोरी शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी प्रयत्न केले असून, शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. प्रत्येक वाॅर्डात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. निवडणुकीबाबत वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार स्वबळ किंवा आघाडी हे ठरेल. केलेल्या विकासकामावर व अजूनही करावयाच्या विविध विकासाच्या योजना जनतेसमोर ठेवत आम्ही निवडणूक लढविणार आहोत.

- रचना जाधव, नगराध्यक्ष, दिंडोरी

कोट...

आम्ही विरोधी गटात असतानाही राज्यात भाजपच्या सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी आणून सर्व वॉर्डमध्ये विकासकामे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात सत्ताधारी गटाकडून अडथळे आणले गेले. आता निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठराविक वाॅर्डात विकासकामे होत असली तरी त्यात कोणतेही नियोजन नाही. कामे रखडली असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहराच्या सर्वांगीण व नियोजनात्मक विकासाचा आराखडा जनतेपुढे ठेवत आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. - प्रमोद देशमुख, भाजप गटनेते

इन्फो...

आजी - माजी आमदारांच्या रणनितीकडे लक्ष

गेल्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये असलेले माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्याशी जुळवून घेत आघाडी करीत निर्विवाद बहुमत मिळवले होते. सत्तेची दोरी त्यांच्या हातात होती. मात्र, काही नगरसेवकांनी त्यांची साथ सोडली असली तरी त्यांच्याकडे इच्छुकांची भाऊगर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सध्या ते शिवसेनेत असून, त्यांच्या रणनितीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. माजी आमदार धनराज महाले यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, तर विद्यमान आमदार विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची असून, ते काय व्यूहरचना आखतात, यावर बरेच काही अवलंबून आहे. स्वबळ, युती, महाविकास आघाडी, की स्थानिक विकास आघाडी यावर निवडणूक रंगणार आहे.

020921\02nsk_47_02092021_13.jpg~020921\02nsk_48_02092021_13.jpg

नगरपंचायत कार्यालय~रचना जाधव

Web Title: All parties are ready to try their best in frontline politics!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.