युवतीच्या आत्महत्येप्रकरणी सर्वपक्षीयांचा पोलीस ठाण्यात घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 10:05 PM2022-01-05T22:05:38+5:302022-01-05T22:07:13+5:30
सिन्नर : येथील संजीवनीनगर भागातील २५ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर सात दिवस उलटूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. ५) सिन्नर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलीस निरीक्षकांवर प्रश्नांची सरबत्ती केली. सदर युवतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीयांनी पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली.

किरण राजेंद्र सानप (२५) या संजीवनीनगर भागात राहणाऱ्या युवतीने आठ दिवसांपूर्वी राहत्या घरात ओढणीने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेला सात दिवस उलटल्यानंतरही युवतीच्या संशयास्पद आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तपासात ढिलाई दाखवल्याचा आरोप करत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी बुधवारी सिन्नर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या घटनेचा जाब विचारला. भाजप नेते भाऊसाहेब शिंदे, जयंत आव्हाड, रमेश नागरे, वंजारी फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष कृष्णा दराडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद चोथवे, सोमनाथ वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजाराम मुरकुटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह समाधान गायकवाड, मुजाहिद शेख, मोहसीन शेख मराठा व वंजारी महासंघाचे पदाधिकारी यांनी पोलीस ठाण्यात घेराव घातला. पोलीस निरीक्षक मुटकुळे यांना बाहेर बोलावून निवेदन देण्यात आले. संशयितास त्वरित अटक करावी व सखोल तपास करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
..अखेर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा
युवतीने आत्महत्या करून आठ दिवस उलटल्यानंतर कारवाई होत नसल्याने बुधवारी सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन जाब विचारल्यानंतर नातेवाइकांचे जबाब व फिर्याद घेऊन सायंकाळी संशयित रईस शेख याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.
उद्या मोर्चासह रास्ता रोको
याप्रकरणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी १२ वाजता मोर्चा काढण्याची व बसस्थानकासमोर रास्ता रोको करण्याची घोषणा भाऊसाहेब शिंदे यांनी केली. युवतीच्या वडिलांचे लहानपणी निधन झाले, तर सांभाळ करणाऱ्या आजी-आजोबांचा कोरोना लाटेत मृत्यू झाला. त्यामुळे युवतीच्या एकाकीपणाचा फायदा उठवून आरोपीला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप अनेकांनी केला.