पाणीटंचाईविरुद्ध सर्वपक्षीय नगरसेवकांनी बांधली मोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:11 AM2021-07-02T04:11:13+5:302021-07-02T04:11:13+5:30

येवला (योगेंद्र वाघ) : येवला नगरपालिका सार्वत्रिक निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने पालिका राजकारणातील शेवटचा अध्याय आता सुरू ...

All party corporators built a moat against water scarcity | पाणीटंचाईविरुद्ध सर्वपक्षीय नगरसेवकांनी बांधली मोट

पाणीटंचाईविरुद्ध सर्वपक्षीय नगरसेवकांनी बांधली मोट

Next

येवला

(योगेंद्र वाघ) : येवला नगरपालिका सार्वत्रिक निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने पालिका राजकारणातील शेवटचा अध्याय आता सुरू झाला आहे. गेली साडेचार वर्षे सुखनैव सुरू असणारा पालिकेतील कारभार आता एकतर्फी व विश्‍वासात न घेता सुरू असल्याचे सांगत सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपनगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली मोट बांधली आहे. यासाठी शहराचा विकास थांबला असून पाणीटंचाईचा मुद्दा हाती घेत जनतेच्या तक्रारींचा हवाला दिला जात आहे. सन २००३ मध्ये पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर सहा दिवसांआड पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. त्यावेळी पाणीप्रश्‍नावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. शहराला गत महिन्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. शहराला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत होता. कमी दाबाने, दूषित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी सुरू झाल्या. याबरोबरच पालिका कारभाराबाबतही प्रतिक्रिया उमटू लागल्या. लोकचर्चेत पालिका कारभार अन् कारभारी टीकेचे लक्ष्य ठरू लागले. पाणी प्रश्‍नावरून सुरू झालेल्या या राजकारणाचा प्रवाह पुढे अविश्‍वासाच्या दिशेने जात विकासाचा मुद्दाही हाती घेतला गेला. उपनगराध्यक्ष सूरज पटणी यांचे नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नगरसेवक एक झाले. पटणी यांना प्रभारी नगराध्यक्षपदाचे मधाचे बोट लावले गेले. बैठका सुरू झाल्या आणि नगराध्यक्ष वगळून पालिकेचा कारभारच पटणी यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या साथीने हाती घेतला. यादरम्यान, नाराजांच्या बैठका, कानगोष्टी आणि नेत्यांच्या भेटी-गाठी झाल्या. नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्याशीही नाराज गटाच्या वतीने थेट संवाद साधल्या गेला. पालिका राजकारणाचा विचार केला तर कोणत्याच पक्षाला कोणत्याच पक्षाच्या सत्तेसाठी वावडे नाही हे वेळोवेळी दिसून आले आहे. नगराध्यक्ष क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून थेट जनतेतून निवडून आले आहेत. मात्र, त्यानंतर त्यांचा अध्यक्षपदाचा प्रवास हा राष्ट्रवादी-शिवसेना-अपक्ष यांच्याच बळावरच सुरू होता. छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असल्याने पालिकेला अध्यक्ष भाजपाचा असतानाही विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी मिळालेला आहे अन् आजही मिळतो आहे.

पालिकेची कोटी-कोटींची उड्डाणे सुरू असली तरी शहरातील मूलभूत प्रश्‍न आजही कायम आहेत. सर्वसाधारण जनतेचे गटार, रस्ते, स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी याबाबतच्या तक्रारी आजही कमी नाहीत. क्षीरसागर यांच्या कार्यकाळातील सरत्या साडेचार वर्षांचा विचार केला तर पालिका कारभाराबाबत नाराजी लपून राहिलेली नाही. पालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांबाबतही सर्वसामान्यांच्या तक्रारी आता पुढे येऊ लागल्या आहेत. सुसंवादाने होते प्रगती, विसंवादाने अधोगती, असा फलक नगरपालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांचे दालनात लावलेला होता. आताच्या काळात पालिकेतच सुसंवादच नसल्याचे अधोरेखित होते. पालिकेचा कारभार, विकासकामे त्यावर खर्च होत असलेले कोट्यवधी रुपये याबाबतच्या तक्रारी वाढत असताना कामाची गरज, तातडी व गुणवत्ता हा प्रश्‍नदेखील उपस्थित होत आहे. समाजकारणातून राजकारण अन् राजकारणातून लाभ हे सूत्र आता लपून राहिलेले नाही. त्यामुळेच नगरपालिकेबाबत लोण्याचा गोळा अन् मधाचे बोट... ही लोकचर्चा झडत आहे.

Web Title: All party corporators built a moat against water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.