चणकापूरच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय बैठक
By admin | Published: October 25, 2015 11:09 PM2015-10-25T23:09:56+5:302015-10-25T23:10:21+5:30
चणकापूरच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय बैठक
कळवण : चणकापूर धरणातील पाणी पाइपलाइनद्वारे मालेगाव येथे नेण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी २८ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात विचारविनिमय करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली.
चणकापूर धरणातून मालेगाव शहरातील जनतेसाठी पिण्याचे पाणी आरक्षित करून आवर्तन पद्धतीने गिरणा नदीतून दिले जाते. हे पाणी देण्यास कळवणकरांचा विरोध नाही; मात्र मालेगाव महापालिका व युती शासनाचा पाइपलाइनद्वारे पाणी नेण्याच्या प्रस्तावास विरोध आहे. पाइपलाइनद्वारे पाणी नेल्यास गिरणा नदीकाठची शेती व पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी कोरड्याठाक पडणार आहेत. परिणामी या भागातील नागरिकांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. नदीकाठचा शेतकरी देशोधडीला लागणार आहे. म्हणून पूर्वीसारखेच नदीतून रोटेशनद्वारे पाणी द्यावे अशी सर्वपक्षीय व नागरिकांची मागणी आहे. याबाबत विचारविनिमय करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती गोविंद पगार यांनी दिली. बैठकीस कसमादे परिसरातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असेही आवाहन पगार यांनी केले आहे. (वार्ताहर)