नाशिक जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंपाची तपासणी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 07:17 PM2018-01-15T19:17:11+5:302018-01-15T19:20:00+5:30
गेल्या आठवड्यात एका व्यक्तीने पेट्रोलपंपातून बाटलीमध्ये पेट्रोल घेतले असता, त्यात पाणी मिश्रीत इंधन देण्यात आले. या संदर्भात पेट्रोलपंप चालकाकडे तक्रार केली असता, त्याने दुर्लक्ष केल्याने सदर व्यक्तीने थेट जिल्हा पुरवठा अधिका-यांकडे तक्रारी केली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिका-यांनी
नाशिक : पेट्रोलपंपातून पाणी मिश्रीत इंधनाचा पुरवठा होणे, कमी इंधन भरणे आदी स्वरूपाच्या तक्रारींची दखल घेत सोमवारी जिल्हा पुरवठा अधिका-यांनी तेल कंपन्यांच्या विक्री प्रतिनिधींची बैठक घेऊन येत्या पंधरा दिवसात सर्वच पेट्रोलपंपाची तपासणी करून त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
गेल्या आठवड्यात एका व्यक्तीने पेट्रोलपंपातून बाटलीमध्ये पेट्रोल घेतले असता, त्यात पाणी मिश्रीत इंधन देण्यात आले. या संदर्भात पेट्रोलपंप चालकाकडे तक्रार केली असता, त्याने दुर्लक्ष केल्याने सदर व्यक्तीने थेट जिल्हा पुरवठा अधिका-यांकडे तक्रारी केली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिका-यांनी या बाबत जिल्हा पुरवठा अधिका-यांना सर्व पेट्रोलपंपाची तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन आॅईल या कंपन्यांच्या विक्री अधिका-यांची बैठक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्यात प्रामुख्याने उपरोक्त बाबींची चर्चा झाली. पेट्रोलपंप तपासणीसाठी वेगवेगळ्या यंत्रणा असल्याने त्यांनाही यात सहभागी करून घेण्याचे ठरविण्यात आले. पाणी मिश्रीत इंधनाचा पुरवठा होणे अशक्य असल्याचे तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींचे म्हणणे असून, अपवाद वगळता पंपाची टाकीला गळती लागल्यावर हा प्रकार घडू शकतो परंतु ते तपासून पहायला हवे असे त्यांनी सागिंतले. तथापि, पेट्रोलमध्ये सरकारने इथेनॉलचा वापर करण्याची सक्ती केली असून, इथेनॉलचा रंगही पाण्यासारखाच असतो त्यामुळे कदाचित ज्याला पाणी समजण्यात आले असावे असाही अंदाज आहे. सरकारने पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉलचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. इथेनॉलचा पाण्याशी संबंध आल्यास त्याचे रूपांतर पाण्यात होते असा युक्तीवादही यावेळी करण्यात आला. मात्र असे असले तरी, वैधमापन विभागाच्या मदतीने सर्व पेट्रोलपंपांच्या इंधनाचे नमुणे घेऊन ते तपासण्याच्या व त्याचा अहवाल पंधरा दिवसात सादर करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.