सर्व वीजउपकेंद्रे आता स्काडा सेंटरवरून नियंत्रित
By admin | Published: March 22, 2017 01:11 AM2017-03-22T01:11:38+5:302017-03-22T01:11:53+5:30
नाशिकरोड :शहराला वीज पुरवठा करणारी सर्व वीज उपकेंद्रे एकाच ठिकाणाहून नियंत्रित करणाऱ्या स्काडा सेंटरचे कामाची केंद्र शासनाच्या ऊर्जा विभागाचे सचिव पी.के. पुजारी यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले.
नाशिकरोड : नाशिक शहराला वीज पुरवठा करणारी सर्व वीज उपकेंद्रे एकाच ठिकाणाहून नियंत्रित करणाऱ्या जेलरोड येथील स्काडा सेंटरचे कामाची केंद्र शासनाच्या ऊर्जा विभागाचे सचिव पी.के. पुजारी यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले.
नाशिक शहरातील २७ वीज उपकेंद्रे एकाच ठिकाणाहून नियंत्रीत करणारी मध्यवर्ती यंत्रणा जेलरोड शिवाजीनगर येथील स्काडा सेंटरमध्ये (सुपरवायजरी कंट्रोल अॅँड डेटा एक्वीझिशन सिस्टीम) उभारली जात असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित होणार असून त्या पार्श्वभूमीवर नुकतीच केंद्रीय ऊर्जा विभागाचे सचिव पी.के. पुजारी यांनी स्काडा सेंटरला भेट देऊन पाहणी करत सविस्तर माहिती घेतली. सध्याच्या स्थितीला पाच उपकेंद्र स्काडा सेंटरला जोडले असून उर्वरित २२ उपकेंद्र जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. स्काडा सेंटरमधून उपकेंद्रातून सुरू असलेल्या वीज पुरवठ्याची सद्यस्थिती, कोणत्या भागात किती दाबाने वीजपुरवठा होत आहे, वीज पुरवठ्यात आलेले अडथळे आदि बाबी आॅनलाइन पाहता येणार आहे. तसेच संबंधित उपकेंद्रातील वीजपुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याची प्रणालीही स्काडा सेंटरमधून उपलब्ध होणार आहे. या प्रणालीमुळे वीज खंडित होण्याचे ठिकाण व कारण लगेच कळणार असल्याने दुरुस्तीही तातडीने होऊ शकेल. वाहिनीवरील बिघाड शोधण्यासाठी सध्या लागणारा वेळ या प्रणालीमुळे वाचणार आहे. यावेळी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे नोडल अधिकारी प्रदीप कुमार, महावितरणचे कार्यकारी संचालक चंद्रशेखर येरमे, प्रशिक्षण व सुरक्षा मुख्य महाव्यवस्थापक रंजना पगारे, प्रभारी अधीक्षक अभियंता अभिमन्यू चव्हाण, कार्यकारी अभियंता देवेंद्र सायनेकर, एस.एस. सवाईराम, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता संदेश लंभाते, उपकार्यकारी अभियंता अजय सुळे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
स्काडा सेंटरमधील कामाच्या पाहणीप्रसंगी केंद्रीय ऊर्जा विभागाचे सचिव पी.के. पुजारी. समवेत दीपक कुमठेकर, भुजंग खंदारे, प्रदीप कुमार, चंद्रशेखर येरमे, अभिमन्यू चव्हाण, देवेंद्र सायनेकर, रंजना पगारे आदि.