बंडखोरांना सर्वपक्षीय अभय !
By admin | Published: February 14, 2017 01:14 AM2017-02-14T01:14:43+5:302017-02-14T01:15:01+5:30
निवडणुकीनंतर निर्णय : उमेदवारांमध्ये नाराजी
नाशिक : महापालिका निवडणुकीत पक्षाने अन्याय केल्याची भावना व्यक्त करीत, सर्वपक्षीय बंडखोरांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करून पक्षाच्या अधिकृत उमेदवारापुढे आव्हान उभे केले असताना पक्षाने मात्र या बंडखोरांच्या कृत्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेत एकप्रकारे त्यांना अभय दिले आहे. पक्षाने या प्रश्नी साधलेल्या चुप्पीमुळे अधिकृत उमेदवारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी मिळेलच अशी आशा बाळगून असलेल्या इच्छुकांनी गेल्या सहा महिन्यांपासून निवडणूक तयारी सुरू केली होती. प्रभागात पक्षाच्या माध्यमातून लोकोपयोगी कामे करण्याबरोबरच, प्रश्न व समस्या घेऊन विविध आंदोलने करून मतदारांचा कैवार घेत, स्वत:ची समाजसेवक अशी प्रतिमाही निर्माण केली होती. अर्थात हे करीत असताना दुसरीकडे महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवत एकेक पावलेही टाकली गेली. प्रत्यक्षात निवडणुकीची घोषणा होताच, राजकीय हालचाली गतिमान झाल्या, अनेकांनी राजकीय बदलाचे वारे लक्षात घेऊन या पक्षातून त्या पक्षात उड्या घेतल्या गेल्याने प्रभागाचे राजकीय चित्रच बदलून गेले. ज्या इच्छुकांनी पक्षाच्या भरवशावर निवडणुकीची तयारी केली, त्यांचा मात्र हिरमोड झाला. पक्षानेदेखील अशा निष्ठावंतांवर अन्याय करीत, अन्य पक्षांतून आलेल्यांना प्राधान्य देत उमेदवारीचे तिकीट त्यांच्या हातात सोपविले. त्यामुळे सर्वपक्षीय इच्छुकांवर अन्याय झाला. इतक्या दिवसांपासून केलेली तयारी वाया जाऊ नये म्हणून काहींनी पक्षनिष्ठेपायी माघार घेतली, तर काहींनी ‘अभी नही तो कभी नही’ असे म्हणत बंडाचा झेंडा हाती घेत अपक्ष उमेदवारी केली. त्यामुळे प्रभागातील लढतीचे चित्र बदलून गेले. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरांनी आव्हान उभे केल्याने अधिकृत उमेदवार धोक्यात आले आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवारांचे राजकीय भवितव्य अंधारात आलेले असताना पक्षाच्या नेत्यांनी मात्र या बंडखोरीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली आहे.
काही प्रभागांमध्ये पक्षाचे अधिकृत उमेदवार कमकुवत असून, नाईलाजाने निष्ठावंतांना डावलून उमेदवारी द्यावी लागल्यामुळे बंडखोरांचे पारडे जड असल्याचे पक्षाच्या नेत्यांनीही मान्य केले आहे. त्यामुळे आत्ताच पक्षातून त्यांची हकालपट्टी केली व उद्या निवडणुकीत जर तेच निवडून आले तर सत्ता स्थापनेसाठी अडचण होण्याची भीतीच पक्षाच्या नेत्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे बंडखोरांकडे दुर्लक्ष करण्याची व निवडणुकीनंतर त्यांची राजकीय ताकद ओळखून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)