शहरातील सर्व दुकाने आज उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 11:01 PM2020-05-05T23:01:29+5:302020-05-05T23:10:32+5:30
नाशिक : कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागातील सर्व प्रकारची दुकाने सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानी दिली असून, बाजारपेठ पुन्हा एकदा गजबजणार आहे.
नाशिक : कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागातील सर्व प्रकारची दुकाने सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानी दिली असून, बाजारपेठ पुन्हा एकदा गजबजणार आहे. मद्यविक्रीसंदर्भातील निर्णय पुढील आदेशापर्यंत प्रलंबित ठेवण्यात आला आहे. दरम्यान, दुकानदारांना डिस्टन्स नियम आणि सुरक्षिततेची काळजी घेणे बंधनकारक असून, सवलतीचा गैरफायदा घेतल्यास दिलेली सवलत पुन्हा रद्द करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे.
नाशिक महापालिका क्षेत्र हे रेड झोनमध्ये असले तरी कोरोनाचा आजार आणि अर्थचक्र यांची सांगड घालण्यासाठी रेड झोनमधील दुकाने सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आलेली आहे. गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी मात्र दुकानदारांनी घेणे अपेक्षित आहे. कुठेही सवलतीचा अतिरेक होत असेल तेथे निर्बंध लावण्याचा अधिकार जिल्हाधिकारी, मनपा आणि पोलीस प्रशासनाला राहणार आहेत. जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन वगळता रेड व आॅरेंज झोनमधील सर्व दुकाने, खासगी आस्थापना, उघडण्यास व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, हॉटेल, शॉपिंग मॉल, सलून, जिम हे मात्र बंदच राहणार आहेत.
----
कोरोनामुळे थांबलेल्या अर्थचक्राला गती मिळावी आणि काही प्रमाणात रोजगाराचा प्रश्न मिटावा म्हणून दुकानांना परवानी देण्यात आलेली आहे. आपण अजूनही रेड झोनमध्येच आहोत, परंतु दुकाने सुरू करण्याच्या सवलतीचा कुठेही उद्रेक आणि उल्लंघन होणार असेल तर प्रसंगी सवलत मागे घेतली जाऊ शकते.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी
----------------
मद्यविक्री बंदच
४सोमवारी (दि.४) जिल्ह्यातील मद्यविक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर बाजारात झालेली गर्दी आणि त्यामुळे कोरोना पसरण्याचा धोका लक्षात घेता मद्यविक्रीची परवानगी अवघ्या दोन तासातच मागे घेण्यात आली होती. तर जिल्ह्यातील संचारबंदीदेखील वाढविण्यात आली. मद्यविक्री संदर्भातील आराखडा करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिलेले आहेत. तूर्तास जिल्ह्यातील दुकाने बंद राहणार आहेत.
-------
दुकानांची वेळ अशी
रेड, आॅरेज झोन - सकाळी ७ ते सायंकाळी ७
कंटेंमेंट झोन - सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत.
(दूधविक्री सकाळी ६.३० ते ७.३० दुपारी ४ ते सायं. ५.३०
---------
‘हे’ राहणार बंद
सलून, हॉटेल, शॉपिंग मॉल, चित्रपट व नाट्यगृह, पान, तंबाखू, मद्य दुकाने, बार आणि सभागृहे, असेंल्ली हॉल, जलतरण तलाव, उद्याने, शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, धार्मिक स्थळे, मेळावे, सभा, गर्दी होणारे कार्यक्रम.