शनिवार, रविवार सर्व दुकानेही राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:16 AM2021-03-10T04:16:22+5:302021-03-10T04:16:22+5:30
नाशिक : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने नाशिक जिल्ह्यात काही प्रमाणात निर्बंध लावण्यात आलेले आहेत. त्यानुसार बुधवार (दि.१०) पासून ...
नाशिक : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने नाशिक जिल्ह्यात काही प्रमाणात निर्बंध लावण्यात आलेले आहेत. त्यानुसार बुधवार (दि.१०) पासून दर शनिवार आणि रविवारी जीवनावश्यक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकानेदेखील बंद ठेवली जाणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढले आहेत.
जिल्ह्यात गेल्या ३ मार्चपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढलेली आहे. राज्यात ज्या शहरांमध्ये कोरेाना रुग्णसंख्या वाढत आहे त्यामध्ये नाशिक जिल्ह्याचादेखील समावेश असल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी मांढरे यांनी निर्बंध आदेश जारी केले आहेत. त्यानुसाार बाजारपेठेतील गर्दी कमी करण्यासाठी सर्व प्रकारची दुकाने ही दर शनिवार आणि रविवारी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेतच दुकाने सुरू राहणार असून शनिवार, रविवारी मात्र पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. या आदेशातून जीवनाश्यक सेवेतील दुकाने, व्यवसाय वगळण्यात आले आहेत.
शनिवार आणि रविवारी नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडतात. अनेकदा लोक बाजारपेठांमध्ये उगाचच गर्दीही करतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक फैलावण्याचा धोका असतो, किंबहुना केंद्रीय निरीक्षण समितीने याबाबतचे मतही नोंदविले आहे. त्यामुळे केरोनाचा फैलाव रोखण्यासाठी बाजारपेठा आठवड्यातून दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठवड्यातून दोनदा म्हणजे शनिवार, रविवारी धार्मिक स्थळे बंद राहणार आहेच. आता दुकानेदेखील बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद आहे. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी करणे हे प्रथम प्राधान्यावर आहे. त्यामुळे गर्दी होणाऱ्या संभाव्य सर्व ठिकाणी निर्बंध घालण्यात आलेले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाणार आहे.
गर्दी करणारे तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात असली तरी नागरिक नियम पाळत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणे काेरोनाचे स्प्रेडर ठरत आहेत. त्यावर निर्बंध आणण्यात आले आहे.
--कोट--
गर्दी टाळण्यासाठी दुकाने बंद
शनिवार आणि रविवार अशा दोन्ही दिवशी सर्व दुकाने व धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. सुट्टीच्या दिवशी लोक बाजारपेठेत गर्दी करीत असतात. अशा प्रकारची गर्दी टाळण्यासाठी सलग दोन दिवस दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. शहर आणि जिल्ह्यासाठी हे निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहेत.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी
--इन्फाे--
जिल्हाबंदी केली जाणार नाही
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार इतर जिल्ह्यांतील प्रवाशांना नाशिकमध्ये येण्यास कोणत्याही प्रकारे निर्बंध घालण्यात आलेलेे नाहीत असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कोरोना नियमांचे पालन करून नागरिकांनी प्रवास करणे अपेक्षित आहे. संबंधितांनीदेखील प्रवासाबाबतीत सुरक्षितता नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे मागील वर्षी असलेला जिल्हाबंदीचा निर्णय तूर्तास लागू करण्यात आलेला नाही.