अर्ज करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:14 AM2021-05-24T04:14:41+5:302021-05-24T04:14:41+5:30
नाशिक : बालकांचा शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्य शाळांमधील आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील मुलांसाठी राखीव २५ ...
नाशिक : बालकांचा शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्य शाळांमधील आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील मुलांसाठी राखीव २५ टक्के जागांवर २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी सोडत जाहीर झाली असली तरी अद्याप प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. प्रवेश प्रक्रिया लांबल्याने सोडतीत प्रवेशाची संधी न मिळालेल्या विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्येही प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे पालकांमध्ये त्यांच्या मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून अर्ज करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी पालकांकडून जोर धरू लागली आहे.
नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांमधील ४ हजार ५४४ जागांसाठी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी तब्बल १३ हजार ३३० ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ७ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या सोडतीमध्ये केवळ ४२०८ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. मात्र यापैकी प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रिक्त राहणाऱ्या जागांसाठी पुन्हा प्रतीक्षा यादी जाहीर केली जाणार आहे. अशा परिस्थितीत प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधीची दीर्घकाळ प्रतीक्षा कारावी लागत असल्याने त्यांना अन्य शाळांमध्येही प्रवेश मिळत नसल्याचे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. त्यामुळे पालकांची निराशा होत असल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटतो. त्यामुळे या वर्षी अर्ज करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे
-----
इन्फो -
जिल्ह्यातील आरटीईची स्थिती
शाळा - ४५०
उपलब्ध जागा - ४,५४४
प्राप्त अर्ज - १३,३३०
लॉटरीत निवड - ४,२०८
---
कोट-
अनुदानित, खासगी अनुदानित व विनाअनुदानित जवळपास सर्वच शाळांमधील पहिलीचे प्रवेश पूर्ण होत आले आहेत. अशा परिस्थितीत आरटीई अंतर्गत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांचेही प्रवेश अद्याप होऊ शकलेले नाहीत. तर प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊन शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अर्ज करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत मोफत प्रवेश मिळणे आवश्यक आहे.
- दीपाली थेटे, पालक, राजीवनगर