शुक्रवारी सर्व कोषागार कार्यालये सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 03:35 PM2018-03-28T15:35:26+5:302018-03-28T15:35:26+5:30
शासनाकडून मार्च अखेरीस निधी उपलब्ध करून दिला जात असल्याने सदर उपलब्ध झालेला निधी ३१ मार्च अखेर कोषागार, उपकोषागार कार्यालयात देयके सादर करून खर्च करणे अनिवार्य असल्याने या काळात देयकांच्या संख्येत वाढ होते त्यामुळे ट्रेझरी नेट, बिम्स व सेवार्थ या
नाशिक : दरवर्षी मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरक मागणीद्वारे व सुधारित अंदाजपत्रकाद्वारे विविध विभागांना निधी उपलब्ध करून दिला जात असतो, मात्र बहुतांशी निधी ३१ मार्च या अखेरच्या दिवशीच दिला जात असल्याने त्यानिमित्ताने कोषागार कर्मचारी, अधिकाऱ्यांवर पडणारा ताण पाहता शासनाच्या वित्तविभागाने येत्या ३० मार्च रोजी शासकीय सुटीच्या दिवशीही सर्व लेखा कोषागार व उप कोषागार कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या संदर्भात शासनाने आदेश काढून त्यात म्हटले आहे की, शासनाकडून मार्च अखेरीस निधी उपलब्ध करून दिला जात असल्याने सदर उपलब्ध झालेला निधी ३१ मार्च अखेर कोषागार, उपकोषागार कार्यालयात देयके सादर करून खर्च करणे अनिवार्य असल्याने या काळात देयकांच्या संख्येत वाढ होते त्यामुळे ट्रेझरी नेट, बिम्स व सेवार्थ या संगणकीय प्रणालींवर ताण येवून त्या खंडीत होण्याचे व त्याचा वेग मंदावण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे संभाव्य येणा-या अडचणींचा विचार करता ३० मार्च रोजी शासकीय सुटी असली तरी, त्या दिवशी लेखा कार्यालय तसेच जिल्हा कोषागार कार्यालये चालू ठेवल्यास देयके स्विकृती प्रदानाची कामे करणे शक्य होणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता मार्च महिन्यात कोषागार कार्यालयात सादर केलेली परंतु सदोष देयकांची संख्याही अधिक असल्याने त्याची कोषागार अधिकाºयांकडून काटेकोरपणे तपासणी करणे शक्य नसल्याने संबंधित विभागांनी लवकरात लवकर अशी देयक तात्काळ सादर करण्याच्या सुचनाही शासनाने दिल्या आहेत. तसेच सुधारित अनुदान व पुरवणी मागणीद्वारे प्राप्त होणारे अनुदानाची रक्कम तालुका कोषागार कार्यालयाकडे मागणी केली जाते. तालुका कार्यालयात कर्मचाºयांची वाणवा असल्याने शक्यतो सरकारी कार्यालयांनी जिल्हा कोषागार कार्यालयातच देयके सादर करावीत अशी सुचनाही करण्यात आली असून, प्राप्त होणा-या अनुदानातून प्रवास भत्ता देयके, आस्थापना विषयक पुरवणी देयके, वैद्यकीय खर्च प्रतिपुर्ती देयके अदा करण्यात येणार असल्याचे शासनाने म्हटले आहे.