आयुक्तांविरोधात एकवटल्या सर्व कामगार संघटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 01:32 AM2018-04-03T01:32:34+5:302018-04-03T01:32:34+5:30
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनात शिस्त आणण्याचा प्रयत्न चालविला असतानाच आयुक्तांकडून एकापाठोपाठ अधिकारी-कर्मचारी निलंबनाची कारवाई सुरू असल्याने त्या विरोधात महापालिकेतील सर्व कामगार संघटना एकवटल्या आहेत. सोमवारी (दि.२) पंडित कॉलनीतील लायन्स क्लबच्या सभागृहात आयोजित बैठकीत आयुक्तांनी चालविलेल्या कारवायांचा निषेध करत कृती समिती स्थापन करून त्याद्वारे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला.
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनात शिस्त आणण्याचा प्रयत्न चालविला असतानाच आयुक्तांकडून एकापाठोपाठ अधिकारी-कर्मचारी निलंबनाची कारवाई सुरू असल्याने त्या विरोधात महापालिकेतील सर्व कामगार संघटना एकवटल्या आहेत. सोमवारी (दि.२) पंडित कॉलनीतील लायन्स क्लबच्या सभागृहात आयोजित बैठकीत आयुक्तांनी चालविलेल्या कारवायांचा निषेध करत कृती समिती स्थापन करून त्याद्वारे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक निर्णय घेत प्रशासनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, आयुक्तांकडून कोणतीही शहानिशा न करता अधिकारी व कर्मचारी यांना थेट निलंबनाची कारवाई केली जात असल्याने कामगार-कर्मचारी तसेच अधिकारी वर्गात अस्वस्थता वाढली आहे. त्यासाठीच सोमवारी सर्व कर्मचारी-कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल नापसंती व्यक्त करत टीका करण्यात आली. आयुक्तांची काम करून घेण्याची पद्धत हुकूमशहासारखी असल्याचा आरोप करण्यात आला. कायद्याचा धाक दाखवून निलंबन, बडतर्फीची कारवाई करण्यात येत असल्याबद्दल निषेध करण्यात आला. रात्रीची साफसफाई बंद करण्यात येऊ नये, चुकीच्या पद्धतीने कर्मचारी, कामगारांचे करण्यात आलेले निलंबन मागे घ्यावे, रिक्त पदांची भरती करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. सफाई कर्मचारी काम करत नसल्याचे चित्र निर्माण केले जात असल्याने सफाई कर्मचारी हा घटक बदनाम होत असल्याचा आरोप मेघवाळ, वाल्मीकी संघटनेचे सुरेश मारू यांनी केला. आयुक्तांकडून संघटनांच्या पदाधिकाºयांना तुच्छतेची वागणूक मिळत असल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. यावेळी म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे, मेघवाळ वाल्मीकी संघटनेचे सुरेश दलोड, मागासवर्गीय संघटनेचे नेते माजी महापौर अशोक दिवे, रिपब्लिकन फेडरेशनचे संतोष वाघ, सेवास्तंभचे प्रकाश अहिरे, अखिल भारतीय श्री वाल्मीकी नवयुवक संघाचे अनिल बहोत, तसेच ताराचंद पवार, रमेश मकवाना, विजय बेहनवाल आदी उपस्थित होते.
आज पुन्हा बैठक
सर्व कामगार संघटनांनी आयुक्तांच्या भूमिकेविरुद्ध लढा पुकारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, मंगळवारी (दि.३) दुपारी १२ वाजता महापालिका कर्मचारी, कामगार सेनेच्या कार्यालयात सर्व संघटना प्रतिनिधींची बैठक होणार असून, त्यात सर्व नेत्यांची कृती समिती स्थापन करून पुढील दिशा ठरविली जाणार आहे.