अमित ठाकरेंना अपमानास्पद वागणूक दिल्याचा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2023 11:47 AM2023-07-23T11:47:52+5:302023-07-23T11:48:07+5:30
बराच वेळ ताफा अडविण्यात आल्याचा मनसैनिकांचा आरोप आहे. ठाकरे हे रवाना झाल्यानंतर संतप्त कार्यकर्ते मध्यरात्री अडीच वाजता टोल नाक्यावर आले
शैलेश कर्पे
नाशिक - अमित ठाकरे यांची ओळख देऊनही समृध्दी महामार्गावरील या टोलनाक्यावर त्यांना अर्धा तास थांबवून ठेवण्यात आले. अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. अहमदनगरहून सिन्नरकडे जात असताना हा प्रकार घडला.
मनसे नेते अमित ठाकरे हे मुंबई येथे जात असताना शनिवारी मध्यरात्री सिन्नर येथील टोलनाक्यावर त्यांच्या वाहनांचा ताफा अडविण्यात आला. बराच वेळ ताफा अडविण्यात आल्याचा मनसैनिकांचा आरोप आहे. ठाकरे हे रवाना झाल्यानंतर संतप्त कार्यकर्ते मध्यरात्री अडीच वाजता टोल नाक्यावर आले. सुमारे १० हून अधिक कार्यकर्त्यांच्या हातात लोखंडी रॉड, काठ्या होत्या. त्यांनी नाक्यावरील केबिनवर हलला चढविला. १० -१५ मिनिटे हा गोंधळ सुरू होता. टोल कर्मचाऱ्यांचा प्रतिकार तोकडा पडला. पोलीस या घटनेची चौकशी करीत आहे. सी सी टी व्ही फुटेज व व्हायरल व्हिडिओ तपासून आरोपींची नावे निष्पन्न केली जाणार आहेत.
नाशिकचे शहराध्यक्ष दिलीप दातीर, मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, नाशिक शहर उपाध्यक्ष अक्षय खांडरे,मनविसे प्रदेश कार्यकारणी सदस्य शशी चौधरी,मनविसे प्रदेश कार्यकारीणी सदस्य बाजीराव मते,शहर संघटक ललित वाघ,मनविसे निफाड तालुकाध्यक्ष तुषार गांगुर्डे, निफाडचे माजी तालुका अध्यक्ष शैलेश शेलार यांच्यासह मनसैनिक यात सहभागी झाले होते.