कचराकुंडी खरेदीत गैरव्यवहाराचा आरोप
By Admin | Published: January 24, 2017 11:02 PM2017-01-24T23:02:26+5:302017-01-24T23:02:43+5:30
चौकशीची मागणी : आम्ही मालेगावकर संघर्ष समितीचे आयुक्तांना निवेदन
मालेगाव : प्लॅस्टिक कचराकुंड्या खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने केला असून या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मनपा आयुक्त रवींद्र जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मालेगाव महापालिकेतर्फे शासनाच्या १४ व्या वित्त अनुदानातून घनकचरा व्यवस्थापन, शौचालय, हरितपट्टा विकसित करण्यासाठी वाहन व साहित्य खरेदी करण्याचा निर्णय ३ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या महासभेत ठराव क्रमांक ११ नुसार घेण्यात आला. त्या ठरावाच्या अनुषंगाने स्वच्छता व मलेरिया विभागासाठी नित्योपयोगी साहित्य पुरवण्याबाबत निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात कचराकुंडी खरेदीस मान्यता देण्यात आली आहे. शहर स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव महापालिकेतर्फे शहरातील विविध भागात, प्रमुख चौकांमध्ये एकूण ५०० गार्बेज बीन्स ठेवण्यात आल्या आहेत. या कचराकुंड्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप आम्ही मालेगावकर समितीने केला आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या कचराकुंड्यांच्या किमतीपेक्षा जास्त दराने कचराकुंड्या खरेदी करण्याचा घाट रचला गेला आहे. यात महापालिकेचे सुमारे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर कंपनीचे वितरक यांनी जास्त प्रमाणात कुंड्या खरेदी केल्यास दोन हजार ८७० रुपयांत सर्व करांसाहित १ कुंडीप्रमाणे देण्याचे मान्य केले आहे. सदर गार्बेज बीन्स खरेदीत महाघोटाळा झाला आहे. ओम सेल्स कार्पोरेशन कंपनीकडून तब्बल ४ ते ५ पट वाढीव किमतीमध्ये खरेदी झालेल्या या महाघोटाळ्याची सखोल चौकशी करून सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निखिल पवार, रविराज सोनार, राहुल देवरे, देवा पाटील, विवेक वारुळे, रफिक इकबाल सिद्दीकी, हेमंत चव्हाण, सचिन खैरनार, अतुल लोढा, गणेश जंगम, कलीम अब्दुल्ला, भाग्येश कासार, विजय देशपांडे, गीतेश बाविस्कर, संजय सोनजे आदिंनी केली आहे. (प्रतिनिधी)