विशेष फेरीत ४ हजार ९१० विद्यार्थ्यांना जागा वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:13 AM2020-12-29T04:13:32+5:302020-12-29T04:13:32+5:30
नाशिक : अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीसाठी सोमवारी (दि. २८) गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, या गुणवत्ता यादीनुसार ...
नाशिक : अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीसाठी सोमवारी (दि. २८) गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, या गुणवत्ता यादीनुसार ४ हजार ९१० विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या विविध महाविद्यालयांमधील जागांचे वाटप करण्यात आले आहे. यात सर्वाधिक विज्ञान शाखेच्या २ हजार ३२७ विद्यार्थ्यांसह कला ७१७, वाणिज्य १ हजार ७२८, तर एचएसव्हीसीच्या १३८ विद्यार्थ्यांना विशेष फेरीत प्रवेशाची संधी मिळाली असून विद्यार्थ्यांना गुरुवार (दि. ३१) पर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी वेळ देण्यात आल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे.
अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत तीन फेऱ्यांद्वारे प्रक्रिया राबवण्यात आली असली तरी अजूनही प्रवेश प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळू न शकल्याने शिक्षण विभागाने रिक्त राहिलेल्या १२ हजार ९७० जागांसाठी विशेष फेरी राबवित सोमवारी (दि.२८) त्यासाठी गुणवत्ता यादी जाहीर केली. शहरात अकरावीच्या जवळपास २५ हजार २७० जागा असल्या तरी तीन फेऱ्यांमध्ये १२ हजार ३०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामुळे राबविण्यात येत असलेल्या विशेष फेरीत ४ हजार ९१० विद्यार्थ्यांना जागावाटप करण्यात आले आहे.
इन्फो-
आरक्षणामुळे वेळापत्रकात बदल
राज्य सरकारने २३ डिसेंबर रोजी एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्लूएस प्रवर्गाचा लाभ देण्यास मान्यता दिली. त्यामुळे अकरावी प्रवेशाचे २४ डिसेंबरपासूनच्या वेळापत्रकात बदल करीत रिक्त असलेल्या जागांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना २७ डिसेंबरला प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे, अर्जाचा भाग दोन भरणे, निवडलेल्या पर्यायामध्ये बदल करण्याची संधी देण्यात आली होती. त्यानुसार जागा वाटप करण्यात आले असून सोमवारी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.