जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे वाटप बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 01:38 AM2020-01-15T01:38:02+5:302020-01-15T01:38:47+5:30
जिल्हा परिषदेच्या सभापतींना विषय समित्यांचे वाटप व विषय समित्यांच्या रिक्त असलेल्या सदस्यांच्या जागा मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभेत बिनविरोध भरण्यात आल्या. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड यांना अर्थ व बांधकाम तर संजय बनकर यांना कृषी व पशुसंवर्धन समिती तसेच सुरेखा दराडे यांना शिक्षण व आरोग्य समिती देण्यात आल्याची घोषणा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केली.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या सभापतींना विषय समित्यांचे वाटप व विषय समित्यांच्या रिक्त असलेल्या सदस्यांच्या जागा मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभेत बिनविरोध भरण्यात आल्या. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड यांना अर्थ व बांधकाम तर संजय बनकर यांना कृषी व पशुसंवर्धन समिती तसेच सुरेखा दराडे यांना शिक्षण व आरोग्य समिती देण्यात आल्याची घोषणा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केली. या सभेत विषय समित्यांच्या ३१ रिक्त जागांपैकी २८ जागांवर सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड २ जानेवारी रोजी तर दुसऱ्याच दिवशी विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली होती. या पदाधिकाऱ्यांना समित्यांचे वाटप करण्यासाठी मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती. स्थायी समितीसह बांधकाम व अर्थ समितीवर सदस्य म्हणून जाण्यासाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने त्या संदर्भातील तडजोडी, गुप्त बैठका व डावपेच आखण्यातच अधिक वेळ गेला. बैठकांवर बैठका होऊनही एकमत होत नसल्याने सभेच्या कामकाजाची वेळ पुढे ढकलावी लागली. अखेर दुपारी तीन वाजता सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. त्यात प्रारंभी सभापतींना विषय समित्यांचे वाटप करण्यात आले.
पदाधिकाºयांना समित्यांचे वाटप करण्यात आल्यानंतर स्थायी समितीच्या दोन रिक्त असलेल्या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. छाया गोतरणे व महेंद्र काले यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या दोन जागांसाठी दीपक शिरसाठ व यशवंत शिरसाठ या दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. कृषी समितीच्या सहा रिक्त जागांसाठी विलास अलबड, कामिनी चारोस्कर, मनीषा महाले व मोतीराम दिवे या चौघांचेच अर्ज आल्याने त्यांची निवड झाली तर दोन जागा रिक्त राहिल्या.
समाजकल्याण समितीच्या तीन जागांसाठी भाऊसाहेब हिरे, अपर्णा खोसकर व भास्कर भगरे या तिघांची तर शिक्षण समितीवर अनुसया जगताप व मनीषा पवार या दोघांची निवड करण्यात आली. बांधकाम समितीच्या तीन जागांसाठी लता बच्छाव, वैशाली खुळे व सिद्धार्थ वनारसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अर्थ समितीच्या सहा जागांवर विजया कांडेकर, इंदुमती ढोमसे, राजेंद्र चारोस्कर, यतिन पवार, प्रवीण गायकवाड, सुनिता चारोस्कर यांची निवड करण्यात आली. पशुसंवर्धन समितीवर शोभा पवार, सुवर्णा देसाई व जया कचरे या तिघांची बिनविरोध निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या तीन जागांसाठी शोभा बर्के, मीनाक्षी
चौरे व गीतांजली पवार या तिघांची निवड करण्यात आली. आरोग्य समितीच्या एकमेव रिक्त असलेल्या जागेसाठी मात्र एकही सदस्याने अर्ज दाखल न केल्याने हे पद रिक्त ठेवण्यात आले.
विशेष सभेस २५ सदस्यांची दांडी
जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकाºयांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच सभेसाठी जिल्हा परिषदेच्या ७२ सदस्यांपैकी २५ सदस्यांनी दांडी मारली. मंगळवारच्या सभेस ४७ सदस्यांनीच हजेरी लावली. गैरहजर राहणाºया सदस्यांमध्ये भाजपचे व त्याखालोखाल शिवसेनेच्या सदस्यांची संख्या अधिक होती. उलट नवनियुक्त पंचायत समित्यांच्या पंधराही सभापतींनी या सभेला हजेरी लावली. त्यापैकी अनेकांची विषय समित्यांवर वर्णी लावण्यात आली.