युतीअंतर्गत तिकीट वाटपाचा तिढा
By Admin | Published: October 30, 2016 11:07 PM2016-10-30T23:07:35+5:302016-10-30T23:23:57+5:30
नगरपालिका निवडणूक : राज्यात भाजपा-सेना युती ... येवल्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस एक पाऊल पुढे
येवला : येवला पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने उमेदवारी वाटपाचा तिढा सोडवत नियोजनासह प्रचारासाठी सिद्ध झाली आहे, तर राज्यातील नगरपरिषदेच्या युतीच्या शंखनादानंतर येवला नगरपालिकेत भाजपा-सेना उमेदवारी वाटपाचा सावळा गोंधळानंतर आता प्रचारासाठी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत भाजपा-सेना युती अंतर्गत तिकीट वाटपाचा तिढा सुटेपर्यंत,...थांबा.....पहा ...आणि उमेदवारी पक्की होते काय ? ते बघा व नंतर प्रचाराला लागा असे म्हणण्याची वेळ भाजपा, सेनेच्या उमेदवारांवर आली आहे.
येवला पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत तब्बल २२५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी आपापल्या पक्षाचे उमेदवार निश्चित करून शनिवारी दुपारी १ वाजताच आपला उमेदवारीबाबतचा अध्याय संपवला. परंतु राज्यात सत्ता असलेला व येवला पालिकेत सत्ता हातात घेण्याचे स्वप्न रंगवत असलेल्या भाजपा सेनेला आपले जागावाटपाबाबत एकमत करता आले नाही. यामुळे भाजपा व सेनेत युतीऐवजी बेकी झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. (वार्ताहर)