पाण्याच्या बाटल्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 01:04 AM2019-04-22T01:04:09+5:302019-04-22T01:04:26+5:30
शब-ए-बरातनिमित्ताने जुने नाशिकमधील खिदमत फाउंडेशनकडून शहरातील विविध बसस्थानके, रेल्वेस्थानकांवर प्रवाशांसह चालक, वाहकांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वाटप करण्याची मोहीम राबविण्यात आली.
नाशिक : शब-ए-बरातनिमित्ताने जुने नाशिकमधील खिदमत फाउंडेशनकडून शहरातील विविध बसस्थानके, रेल्वेस्थानकांवर प्रवाशांसह चालक, वाहकांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वाटप करण्याची मोहीम राबविण्यात आली. यावेळी एक हजारांहून अधिक पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले गेले.
खिदमत फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने ‘शब-ए-बरात’ या पवित्र रात्रीच्या औचित्यावर शनिवारी (दि.२१) दिवसभर निमाणी, जुने सीबीएस, नवे सबीएस, महामार्ग, नाशिकरोड बसस्थानकांवर सीलबंद पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या. या उपक्रमामध्ये फाउंडेशनचे अध्यक्ष नायब शहर-ए-काझी एजाज सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी पारंपरिक इस्लामी पोशाखात सहभागी होत आबालवृद्ध प्रवाशांना पाण्याच्या बाटल्या दिल्या. यावेळी बसचालक, वाहकांनाही पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत हा उपक्रम राबविला गेला. थंड पाण्याने अनेकांनी तृष्णा भागवित समाधान व्यक्त केले. इस्लाम धर्मात तहानलेल्यांना पाणी पाजणे हे मोठे पुण्यकर्म मानले जाते. या अनुषंगाने ‘खिदमत’च्या स्वयंसेवकांनी पवित्र रात्रीच्या औचित्यावर सामाजिक बांधिलकी जोपासली.