कोरोनाच्या सावटाखाली खरिपाची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 09:17 PM2020-05-04T21:17:45+5:302020-05-04T23:03:56+5:30
जळगाव नेऊर : कृषीसंबंधातील सर्व बाबींना लॉकडाउनमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे खते, बी-बियाणे व किटकनाशक खरेदीतील अडचण दूर झाली आहे. परंतु कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच असल्याने कोरोनाच्या सावटाखाली खरिपाची लगबग सुरू झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
जळगाव नेऊर : कृषीसंबंधातील सर्व बाबींना लॉकडाउनमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे खते, बी-बियाणे व किटकनाशक खरेदीतील अडचण दूर झाली आहे. परंतु कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच असल्याने कोरोनाच्या सावटाखाली खरिपाची लगबग सुरू झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
सन २०१९ चा खरीप पाऊस व अवकाळीने गेला. रब्बी पिकालाही सतत मार्केट बंदमुळे विक्र ीस अडचणी येत आहे. शिवाय माल विक्रीस नेला तर त्यास समाधानकारक दर मिळत नसल्याने त्यातून खर्चही निघत नाही. येणाऱ्या खरीप हंगामावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी मशागतीच्या कामात गुंतले आहेत. साधारणत: मे महिन्याच्या शेवटी शेतकरी खते आणि बियाणांच्या खरेदीसाठी कृषी केंद्रांवर येत असतात. तसेच बरेच शेतकरी टोमॅटो लागवडीसाठी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नर्सरीकडे रोपे बुक करण्यासाठी धाव घेतात. परंतु महिनाभरात महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल का, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आला आहे. पेरणी हंगाम जवळ आल्याने भीतीच्या सावटाखाली शेतकरीवर्गाची लगबग सुरू आहे.
चालू हंगामात ७ जूनलाच पावसाचे आगमन होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार वेळेवर पाऊस आल्यास पाण्याची चिंता मिटणार आहे. मात्र मे महिन्यात कोरोना आटोक्यात आला नाही, तर शेती व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
--------
साहित्य खरेदीसाठी कसरत
शेतक-याला अनेक ठिकाणी शेतीस लागणारे साहित्य व माल विक्र ीस बाहेर पडावे लागते व शेतावर विविध ठिकाणांहून मजूर आणावे लागतात. गावाबाहेर जावे लागत असले तरी योग्य ती काळजी घेऊन अंतर ठेवून मार्ग काढण्याचा प्रयत्न शेतकरी करताना दिसत आहे.