कोरोनाच्या सावटाखाली खरिपाची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 12:11 AM2021-05-09T00:11:25+5:302021-05-09T00:12:49+5:30
जळगाव नेऊर : कृषी संबंधातील सर्व बाबींना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदीची अडचण येणार नाही. परंतु कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदीकरिता शहरात जावे लागते, परिणामी शेतकऱ्याला आताच्या खरिपासाठी लागणारे भांडवल तो शेतमाल विकूनच उभे करणे जिकिरीचे होत आहे.

२०२० चा खरीप, रब्बी हंगाम कोरोनाच्या सावटाखाली गेल्याने २०२१ या वर्षातही कोरोनामुळे शेतकरी चिंतेत आहे.
बाजार समित्या कधी बंद, तर कधी चालू यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीस अडचणी येत आहे. शिवाय माल विक्रीस नेला तर त्यास भाव भेटत नसल्याने येणारा २०२१ खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी मशागतीच्या कामात गुंतले आहेत. शेतकऱ्यांची कांदा काढणी, साठवणूक शेती कामे अंतिम टप्प्यात असून शेतीच्या मशागतीला वेग आला आहे.
साधारणत: मे महिन्याच्या शेवटी शेतकरी खते आणि बियाणांच्या खरेदीसाठी कृषी केंद्रांवर येत असतात. तसेच बरेच शेतकरी टोमॅटो लागवडीसाठी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेतकरी अनेक नर्सरीकडे रोपे बुक करण्यासाठी धाव घेतात.
परंतु येत्या काही दिवसात महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल का असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आला असून पेरणी हंगाम जसजसा जवळ येत आहे तसतशी शेतकरी वर्गाची लगबग सुरू झाली आहे. चालू हंगामात हवामान खात्याच्या अंदाजानुसार १ जूनलाच पावसाचे केरळात आगमन होईल, असे वर्तविले असून पाऊस वेळेवर झाल्यास पाण्याची चिंता जरी मिटली तरी कोरोना आटोक्यात आला नाही, तर शेती व्यवसायावर खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तविली जात आहे.
शेतीत जरी फारशी भीती नसली तरी शेतकऱ्याला अनेक ठिकाणी शेतीस लागणारे साहित्य व माल विक्रीस बाहेर पडावे लागते व शेतावर विविध ठिकाणांहून मजूर आणावे लागते, त्याच्यामुळे ही कोरोनाची भीती वाढत आहे. अशा संकटात शेतकरी सापडला आहे. तरीही योग्य ती काळजी घेऊन, अंतर ठेवून मार्ग काढण्याचा प्रयत्न शेतकरी करताना दिसत आहे.
(०८ जळगाव नेऊर)
जळगाव नेऊर येथे शेतात सुरू असलेली नांगरणी.