खरिपाची लगबग सुरू, शेती शिवार फुलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 10:48 PM2020-06-07T22:48:05+5:302020-06-08T00:30:54+5:30
शेतकऱ्यांना आता खरिपाचे वेध लागले असून, शेती मशागतीचे कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील चित्र पालटले असून, शिवार माणसांंनी फुलले आहे.
सिन्नर : शेतकऱ्यांना आता खरिपाचे वेध लागले असून, शेती मशागतीचे कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील चित्र पालटले असून, शिवार माणसांंनी फुलले आहे.
कोरोनाच्या महामारीत सर्वकाही थांबले होते. लॉकडाऊनच्या ८० दिवसांच्या कालावधीत सर्व व्यवहार ठप्प होते. त्यामुळे त्याचा परिणाम शेती व्यवसायावर झाला होता. शासनाने हळूहळू नियम शिथिल केल्याने जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. जगाचा पोशिंदा मात्र गेल्या काही दिवसापासून बांधबंदिस्ती, नांगरणी, कोळपणी करण्यात व्यस्त होता. मान्सून पूर्व पाऊस जोरदार बरसल्याने व कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन होता. लॉकडाऊनच्या काळात शेतीसह सर्व कामकाज ठप्प होते. काही शेतकऱ्यांकडे असणारी उन्हाळी पिके निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने नुकसान सोसावे लागले आहे. सुमारे दोन वर्षापासून शेतकºयांच्या पाठीमागे आर्थिक संकट उभे राहिले आहे. प्रथम दुष्काळ व गतवर्षी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस यामुळे खरीप व रब्बी असे दोन्ही हंगाम वाया गेले आहेत. तर यावर्षी सुरुवातीलाच कोरोनाचे संकट सुरु झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.