फास्टॅगसाठी वाहनधारकांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 10:32 PM2020-12-30T22:32:44+5:302020-12-31T00:21:48+5:30
नाशिक : जिल्ह्यात सध्या सर्वच टोल नाक्यांवर मोठ्या संख्येने वाहनांची गर्दी होते. त्यावर उपाय म्हणून गतवर्षापासून प्रलंबित असलेल्या फास्टॅगचे बंधन आता १ जानेवारी, २०२१ पासून लागू करण्यात आले आहे. नाशिकच्या परीघात घोटी, चांदवड, पिंपळगाव, शिंदे येथे टोल भरावा लागत असल्याने, वाहनधारकांची फास्टॅगसाठी लगबग उडाली आहे.
नाशिक : जिल्ह्यात सध्या सर्वच टोल नाक्यांवर मोठ्या संख्येने वाहनांची गर्दी होते. त्यावर उपाय म्हणून गतवर्षापासून प्रलंबित असलेल्या फास्टॅगचे बंधन आता १ जानेवारी, २०२१ पासून लागू करण्यात आले आहे. नाशिकच्या परीघात घोटी, चांदवड, पिंपळगाव, शिंदे येथे टोल भरावा लागत असल्याने, वाहनधारकांची फास्टॅगसाठी लगबग उडाली आहे.
देशातील सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग आवश्यक करण्यात आले आहे. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि टोल प्लाझावर होणाऱ्या वाहतूककोंडीपासून सुटका करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) फास्ट टॅगच्या नियमाची कठोर अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे. टोल नाक्यावर डिजिटल पद्धतीने पेमेंट होण्याच्या प्रमाणात वाढ व्हावी, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच टोल नाक्यावरील वाहतूककोंडी होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. फास्टॅग हा गाडीच्या आतील बाजूने, समोरील काचेच्या वरच्या बाजूच्या मध्यावर आरशाच्या मागील बाजूस लावायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित स्कॅन होईल. टॅगवर ज्या बाजूला फास्टॅग असे लिहिले आहे, ती बाजू चालकाकडे ठेवून, टॅग काचेवर लावायचा आहे. एकदा टॅग लावल्यानंतर तो परत काढता येत नाही, म्हणून लावण्यापूर्वी आतील काच स्वच्छ करूनच टॅग लावावा लागतो. ज्या वाहनाला फास्ट टॅग नाही, परंतु ते वाहन जर या फास्टॅग लेनमधून जात असेल, तर दुप्पट टोल भरावा लागेल, तसेच जे अजून फास्टॅग मिळवू शकले नाहीत, त्यांच्यासाठी प्रत्येक टोल नाक्यावर एक वेगळी लेन असेल, त्या लेनमधून गेल्यास दुप्पट टोल भरावा लागणार नाही. प्रवासाला निघण्यापूर्वी, फास्टॅग ज्या खात्याशी जोडलेले असेल, त्या खात्यात टोलसाठी आवश्यक तेवढे पैसे असल्याची खात्री करूनच प्रवासाला निघणे आवश्यक आहे, अन्यथा फास्टॅग लेनमधून गेल्यास, रोख दुप्पट टोल भरावा लागेल.
गाडी ज्याच्या नावावर त्याचेच खाते हवे
गाडी वडिलांच्या नावावर असेल, तर मुलाने किंवा दुसऱ्या कुणीही त्यांचे बँक खाते जोडून फास्टॅग काढलेला चालत नाही. ज्यांच्या नावावर गाडी आहे, त्यांनीच त्यांचे वैयक्तिक खाते फास्टॅगला जोडायचे आहे, तसेच फास्टॅग लेनमधे चेकिंग पॉइंटवर आल्यानंतर, आपल्या पुढची स्कॅनिंग होत असलेली गाडी व आपली गाडी, या दोघांमध्ये तीन मीटरपेक्षा जास्त अंतर ठेवायचेच आहे. कदाचित पुढच्या गाडीच्या टॅगला काही अडचण असेल, तर विनाकारण आपला टॅग स्कॅन होऊन त्या गाडीचा टोल आपल्या खात्यातून जाऊ शकतो.