आधीच नुकसान, त्यात चोरट्यांचा त्रास
By admin | Published: August 6, 2016 12:54 AM2016-08-06T00:54:48+5:302016-08-06T00:55:35+5:30
दुकानदार त्रस्त : गोदाघाट परिसरात संधीसाधूंचा उपद्रव; भुरट्या चोरट्यांची चांदी
नाशिक : गोदावरीला आलेल्या पुरामुळे आसपासच्या दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले असतानाच उरल्या सुरल्या सामानांवरही चोरटे हात साफ करीत असल्याने दुकानदारांना दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे दिवसा ढवळ्या दुकानात शिरून चोरट्या महिला साहित्य हातोहात लंपास करीत असल्याच्या घटना घडत आहेत.
पुराच्या पाण्यात व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन दिवस दुकाने पाण्याखाली असल्यामुळे दुकानातील साहित्य वाहून गेले, तर काही साहित्य वाचविण्यात यश आले. माल भिजल्यामुळे एकतर तो फेकून द्यावा लागला तर काही विक्रेत्यांनी भिजलेला माल मिळेल त्या किमतीत विकण्यास सुरुवात केली आहे. निदान थोडेफार पैसे मिळतील या आशेने भिजलेला माल दुकानात तर काहींनी रस्त्यावर मांडला असताना त्यांना चोरट्यांचा उपद्रव सहन करावा लागत आहे.
पंचवटीतील मुठे लेनमधील श्रीराम वस्त्र भांडारचे संचालक किरण सुधाकर धारवळे यांचे ड्रेस मटेरियल, रेडिमेड ड्रेस, साड्यांचे दुकान आहे. पुराच्या पाण्यात दुकानातील कपडे वाहून गेल्यामुळे त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. उरला सुरला माल त्यांनी मिळेल त्या किमतीला विकण्यास सुरुवात केली; मात्र रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मागील दरवाजा तोडून दुकानातील माल चोरून नेला. असाच अनुभव गोदाघाटावरील चहा दुकानदार रावसाहेब राऊत यांनी बोलून दाखविला. पुराच्या पाण्यात चहाची टपरी वाहून गेली मात्र सुरक्षित ठिकाणी ठेवलेले गॅस सिलिंडर चोरट्यांनी चोरून नेले.
ज्या दुकानदारांनी दुकानाची साफसफाई करण्यासाठी उरलेले सामान बाहेर काढून ठेवले आहे, त्यातील साहित्य चोरीस गेल्याच्या घटना घडल्या आहेत. नारळाची पोती, तेलाच्या पिशव्या, काचेच्या बरण्या, तांदळाचे कट्टे चोरट्यांनी चोरून नेले. काहींनी तर दुकानाचे पत्रे, लोखंडी अॅँगल, खुर्च्यादेखील चोरून नेल्या आहेत. आधीच वाहून गेलेल्या सामानामुळे दुकानदारांचे लाखोंचे नुकसान झालेले असताना चोरट्यांनीदेखील हात साफ केल्याने दुकानदारांना दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे.