आधीच सिलिंडर हजाराच्या घरात; घरपोचसाठी वेगळी लूट कशाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:17 AM2021-09-12T04:17:40+5:302021-09-12T04:17:40+5:30
गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅसच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत असून गतवर्षभरात तब्बल अडीचशे ते तीनशे रुपयांनी घरगुती गॅस ...
गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅसच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत असून गतवर्षभरात तब्बल अडीचशे ते तीनशे रुपयांनी घरगुती गॅस सिलिंडर महागला आहे. त्यासोबतच सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सबसिडीमध्येही मोठी कपात करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे सर्वांची आर्थिक घडी विस्कटलेली असताना घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये तब्बल २९० रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ५९८ रुपयांना मिळणारा सिलिंडर आता तब्बल ८८८ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरांतून पुन्हा चुलीचा धूर निघू लागला आहे. अशा परिस्थितीत गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या डिलिव्हरी बॉकडूनही१० ते २० रुपये अतिरिक्त सेवा शुल्काची मागणी होत असल्याने ग्राहकांकडून आधीच सिलिंडर हजाराच्या घरात गेलेला असताना घरपोच सेवेसाठी वेगळी लूट कशाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
---
सध्याचा गॅस सिलिंडर दर -८८८.५०
शहरातील एकूण ग्राहक - १०,१५,३८५
--
वर्षभरात २९० रुपयांची वाढ
लॉकडाऊनमुळे सर्वांची आर्थिक घडी विस्कटलेली असताना घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये मागील वर्षभरात तब्बल २९० रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात ५९८ रुपयांना मिळणारा सिलिंडर आता तब्बर ८८८ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरांतून पुन्हा चुलीचा धूर निघू लागला आहे.
---
डिलिव्हरी बॉयला वेगळे २० रुपये कशासाठी?
मागील वर्षभरात गॅसचा सिलिंडर जवळपास अडीचशे ते तीनशे रुपयांनी महागला असून ऑनलाईन सिलिंडर बुक करताना ८८८.५० पैसे मोजावे लागतात. या पैशात वितरकांनी घरपोच सिलिंडर देणे अपेक्षित असताना डिलिव्हरी बॉयकडून २० रुपये सर्व्हिस चार्च मागितला जातो. त्याची पावतीही दिली नाही.
-रोहिनी साळवे, गृहिणी
--
सतत वाढत्या महागाईमुळे स्वयंपाकाच्या गॅसचा सिलिंडर भरून घेणे परवडेनासे झाले आहे. दर महिन्याला २५ रुपयांनी सिलिंडर महाग होत असताना वितरकांची कर्मचारी घरपोच सेवा देण्यासाठी आणखी २० रुपयांची मागणी करतात.
- अश्विनी पवार, गृहिणी
--
वितरक म्हणतात...
ग्राहकांनी डिलिव्हरी बॉयला कॅश मेमो व्यतिक्त पैसे देण्याची गरज नाही. गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर कंपनीकडून ग्राहकांना सिलिंडरचा क्रमांक व कॅशमेमोचा तपशील पाठवत असतो. त्यामुळे ग्राहकांनी त्याप्रमाणेच पैसे देणे अपेक्षित असून सिलिंडर घरी पोहोचविण्यासाठी वेगळे पैसे देण्याची गरज नाही. अशाप्रकारे कोणी पैशाची मागणी करीत असेल तर ग्राहकांनी संबंधित वितरकाशी संपर्क साधून तक्रार करणे आवश्यक आहे. मात्र ग्राहकांनी डिलिव्हरी बॉयला कोणत्याही प्रकारे अतिरिक देण्याची गरज नाही.
लक्ष्मण मंडाले, अध्यक्ष, नाशिक जिल्हा गॅस डिलर्स असोसिएशन