माजी विद्यार्थी बनले रक्षणकर्ते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 11:07 PM2020-05-29T23:07:07+5:302020-05-30T00:03:17+5:30
ओझर बाजारपेठेतील अनेक समस्यांनी ग्रासलेल्या जिल्हा परिषद शाळेला माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्वखर्चाने पत्रे टाकून मुख्य मार्ग बंद करत शाळेला संरक्षण दिल्याने चिमुकल्यांनी समाधान व्यक्त केले.
ओझर : बाजारपेठेतील अनेक समस्यांनी ग्रासलेल्या जिल्हा परिषद शाळेला माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्वखर्चाने पत्रे टाकून मुख्य मार्ग बंद करत शाळेला संरक्षण दिल्याने चिमुकल्यांनी समाधान व्यक्त केले.
१४ मे रोजी शाळेबद्दलचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर येथील माजी विद्यार्थी बाळा बोस, अनिल राऊत, मंगेश राऊत, भूषण मोरे, माधव धुळे, दत्ता बोस, फज्जू शेख यांनी स्वखर्चाने पत्रे आणत मुख्य प्रवेशद्वार बंद करून शाळेच्या परिसरात पाळीपाळीने देखरेख करण्यासाठी पुढे सरसावले आहे. विविध समस्यांनी ग्रासलेल्या ओझरच्या बाजारपेठेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला लागलेले ग्रहण सुटत नसतानाच लॉकडाउनचा गैरफायदा अनेक टवाळखोर घेत होते. शालेय आवार मद्यपी, जुगारी आणि प्रेमीयुगुलांचा अड्डा बनले होते. ओझर गावात दोन जिल्हा परिषद शाळा आहेत. महामार्गाच्या पलीकडे मुलांची तर बाजारपेठेत मुलींची. सध्या हायवेच्या शाळेचे निर्लेखन झाल्याने तेथील विद्यार्थी गावातच दोन सत्रांमध्ये कसेबसे शिक्षण घेतात. या शाळेच्या आवाराची खासियत म्हणजे चहूबाजूने आत शिरता येते. शाळा सुटली की इमारतीत सुरू होते ती मद्यपींची मेजवानी. यामुळे आवारात पडलेला बाटल्यांचा खच, फुटलेल्या काचेच्या बाटल्या, मच्छरांचे साम्राज्य, कुबट वास आदी निदर्शनास येत होत्या, तर जुगारींसाठी हे हक्काचे ठिकाण झाले होते. शाळेला संरक्षण भिंतच नसल्याने हे सर्व प्रकार घडत असल्याचे काही माजी विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. ज्ञान घेण्याच्या पवित्र ठिकाणी अवैध घटना घडत असल्याने माजी विद्यार्थ्यांनी शालेय परिसर पत्र्यांच्या माध्यमातून बंद केला आहे. तसेच आक्षेपार्ह घतना टाळण्यासाठी आळीपाळीने पहारा देण्याचेही नियोजन केले आहे.
आम्ही लहानपणी येथेच शिक्षण घेतले आहे. यामुळे या शाळेबद्दल आम्हाला आस्था आहे. सध्या लॉकडाउनमधील परिस्थिती भीषण आहे. येथे अनेक गैरकृत्य होतात. त्यामुळे आम्ही मित्रांनी शाळेच्या पुढच्या भागाला पत्रे लावले आहेत.
- बाळा बोस, माजी विद्यार्थी