‘अलविदा-अलविदा माहे रमजान...’ नाशिकमध्ये शब-ए-कद्र विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी
By अझहर शेख | Published: April 19, 2023 05:58 PM2023-04-19T17:58:57+5:302023-04-19T17:59:44+5:30
अखेरच्या टप्प्यात पोहचलेल्या रमजान पर्वमधील महत्वाची आदर व सन्मानाची रात्र शब-ए-कद्र उत्साहात साजरी करण्यात आली.
नाशिक : ‘आह, अब दिल पे हैं गम गलबा, अलविदा- अलविदा माहे रमजान...’ चे पठण करत मंगळवारी (दि.१८) मुस्लीम बांधवांनी ‘शब-ए-कद्र’ साजरी केली. रमजान पर्वमधील या विशेष रात्रीला धार्मिकदृष्ट्या मोठे महत्व आहे. या रात्रीच्या औचित्यावर शहरातील सर्वच मशिदींमध्ये उशीरापर्यंत समाजबांधवांकडून प्रार्थना करण्यात आली. यावेळी ‘तरावीह’चे विशेष नमाजचेही सामुहिकरित्या पठण करण्यात आले. कुराणपठण, दरूदोसलामचे पठण आदि धार्मिक कार्यक्रम पार पडले. मुस्लीम बांधवांचा निर्जळी उपवासांचा (रोजा) महिना म्हणून रमजान पर्व ओळखले जाते. या पर्वचे २७ उपवास बुधवारी (दि.१९) पुर्ण झाले. उर्वरित तीन उपवास आता शिल्लक राहिले आहे. दरम्यान, अखेरच्या टप्प्यात पोहचलेल्या रमजान पर्वमधील महत्वाची आदर व सन्मानाची रात्र शब-ए-कद्र उत्साहात साजरी करण्यात आली.
यानिमित्ताने शहरातील सर्वच मशिदींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. मशिदींमध्ये संध्यकाळपासून मध्यरात्रीपर्यंत नागरिकांची रेलचेल कायम होती. नमाजपठणानंतर धर्मगुरूंचे प्रवचन पार पडले. यावेळी रमजान पर्व, शब-ए-कद्रच्या रात्रीचे महत्व धर्मगुरूंनी विषद केले. येणारी रमजान ईद कशी साजरी करावी, जकात, फित्राचे गरजू घटकांना तत्काळ वाटप केले जावे, असे आवाहनदेखील धर्मगुरूंनी विविध मशिदींमधून केले. दरम्यान, विविध मशिदींमध्ये विश्वस्त व परिसरातील नागरिकांच्यावतीने मौलवींचा सत्कार करण्यात आला.
शहरातील जुने नाशिकमधील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांचा बडी दर्गा, हजरत सय्यद हसन रांझेशाह बाबा यांचा आनंदवली दर्गा, हजरत पीर मलिकशाह हुसेनी बाबा यांच्या पांडवलेणीच्या दर्ग्यावर भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती. बडी दर्गा येथे मोठ्या संख्येने गर्दी पहावयास मिळाली.
रमजान ईदचे वेध!
ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईदचे वेध आता समाजबांधवांना लागले आहे. अखेरचे चार दिवस शिल्लक राहिल्याने ईदच्या खरेदीलाही वेग आला आहे. मुस्लीम समुदायाकडून नवीन कपडे, पादत्राणे, टोपी, अत्तर आदि वस्तुंची खरेदी केली जात आहे. बाजारपेठांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने संध्याकाळनंतर बाजारात खरेदीसाठी नागरिक कुटुंबांसह येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
शिरखुर्म्याचा गोडवा महागला!
ईदच्यादिवशी घरी शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला दुध, सुकामेव्याचे मिश्रण असलेला खास ‘शिरखुर्मा’ खाऊ घालण्याची पारंपरिक प्रथा आहे. यावर्षी शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या सुकामेवा चांगलाच महागला आहे. खोबरे, खारिक, किसिमस, वेलदोडे, काजु, बदाम, पिस्ता यासह दुधाचीही भाववाढ झाली आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे मागणी घटलेली होती. यावर्षी मागणीही वाढली आहे.