राज्यात अमर, अकबर, अॅँथनीचे सरकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 11:55 PM2020-01-19T23:55:46+5:302020-01-20T00:05:33+5:30
राज्यात सध्या अमर, अकबर, अॅँथनीचे सरकार असून, हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी टीका केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केली. नाशिक शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नाशिक : राज्यात सध्या अमर, अकबर, अॅँथनीचे सरकार असून, हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी टीका केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केली. नाशिक शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना दानवे म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने गत पाच वर्षांत राज्यात विविध विकासकामे सुरू केली आहेत, मात्र राज्यात नव्याने स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार या कामांना स्थगिती देत आहे. केंद्र सरकारने केलेला नागरिकत्व संशोधन कायद्याविषयी विरोधक नागरिकांच्या मनात गैरसमज निर्माण करून त्यांची दिशाभूल करीत आहेत.
स्वातंत्र्याच्या वेळी पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये असलेली हिंदूंची संख्या आणि आजची संख्या यात मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाली आहे. अशा नागरिकांना नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. यामुळे हा कायदा नागरिकत्व हिरवणारा नव्हे, तर नागरिकत्व देणारा कायदा आहे. भाजपच्या मुस्लीम कार्यकर्त्यांनाही हे समजले आहे, असे सांगतानाच दानवे यांनी भाजपच्या मुस्लीम कार्यकर्त्यांनी दिलेल्या राजीनाम्यांबाबत अनभिज्ञता दर्शविली.
केंद्र सरकारने काश्मीरबाबतचे ३७० कलम रद्द केल्याने देशभरात समाधानाचे वातावरण आहे. काश्मिरी जनतेच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी केंद्रातील मंत्री काश्मीरमध्ये जाणार असून, तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सरकारसमोर मांडण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
चंद्रकांत खैरे यांना दिले आव्हान
कर्नाटक आणि महाराष्टÑ सीमा प्रश्नाबाबत बोलताना त्यांनी भाजप सीमावासीयांच्या बाजूने असल्याचे सांगितले. राजूर संस्थानच्या जमिनीच्या प्रश्नावर, मी कोणती जमीन बळकावली हे चंद्रकांत खैरे यांनी सिद्ध करावे, असे आव्हान दानवे यांनी दिले. खैरे यांचा पराभव झाल्यानेच ते असे आरोप करत असल्याचेही त्यांनी म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या नाइट लाइफ प्रस्तावाला त्यांनी विरोध दर्शविला, तर साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद जुनाच असल्याचे सांगून हा प्रश्न राज्य सरकारने सोडवायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.