नववर्षाच्या औचित्यावर भरारी पथकाकडून त्र्यंबकेश्वरला पावणेबारा लाखांचा दमणनिर्मित मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 10:20 PM2017-12-28T22:20:43+5:302017-12-28T22:41:09+5:30
रात्र उलटून गेली मात्र संशयित वाहन नजरेस पडले नाही; मात्र सकाळच्या सुमारास एक पीकअप जीप भरधाव वेगाने घाटातून जात असल्याचे लक्षात येताच पथकाने ती रोखली. यावेळी भगवान बन्सी बढे (रा.दमण) हा वाहनचालक मद्याची वाहतूक करताना पथकाला मिळून आला.
नाशिक : नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मद्याची चोरटी वाहतूकीची शक्यता गृहित धरुन राज्य उत्पादन विभागाकडून भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. भरारी पथक क्रमांक १च्या अधिकाºयांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण घाटात सापळा रचून दमणनिर्मित मद्यसाठ्याची वाहतूक करणारी जीप ताब्यात घेत सुमारे ११ लाख ८८ हजार ५६० रुपयांचे मद्य जप्त केले आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेली माहिती अशी, राज्य उत्पादन विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अधिकाºयांनी तोरंगण घाटात सापळा रचला. विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे, जिल्हा अधिक्षक चरणसिंग राजपूत, मुख्यालय उपअधिक्षक गणेश बारगजे, उपनिरिक्षक प्रवीण मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक रात्रभर घाटात दबा धरून होते. संशयित पिकअप जीपद्वारे मद्यसाठा त्र्यंबकेश्वरमध्ये पोहचविला जाणार असल्याची कुणकुण पथकाला होती. रात्र उलटून गेली मात्र संशयित वाहन नजरेस पडले नाही; मात्र सकाळच्या सुमारास एक पीकअप जीप भरधाव वेगाने घाटातून जात असल्याचे लक्षात येताच पथकाने ती रोखली. यावेळी भगवान बन्सी बढे (रा.दमण) हा वाहनचालक मद्याची वाहतूक करताना पथकाला मिळून आला. पथकाने त्याच्या मुसक्या आवळून वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये ७२ विदेशी कंपन्यांचे मद्याचे खोके हस्तगत केले. यामध्ये मॅकडोनॉल्ड आणि रॉयल स्टॅग कंपनीचे व्हिस्कीचे अनुक्रमे ५२ व ५ खोके एकूण ११ लाख ८८ हजार ५६० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. सदर मद्यसाठा राज्यात विक्रीवर प्रतिबंध आहे.
मद्याचा साठा नाशिकमार्गे अहमदनगरला
आगामी थर्टी फर्स्टच्या औचित्यावर सदरचा दमणनिर्मित मद्याचा साठा त्र्यंबकेश्वर-नाशिकमार्गे अहमदनगरला पोहचविला जाणार होता. चालक बढे याची भरारी पथकाने कसून चौकशी केली असता त्याने कबुली देत सदर मद्यसाठा दमणमधूनन नाशिकमार्गे अहमदनगरला घेऊन जायचा होता, असे सांगितले. कारवाई करणा-या भरारी पथकामध्ये विरेंद्र वाघ, विष्णू सानप, विलास कुवर, सुनील पाटील, विजेंद्र चव्हाण आदिंचे पथक रात्रभर तोरंगण घाटात लक्ष ठेवून होते. पुढील तपास उपनिरिक्षक प्रवीण मंडलिक करीत आहे.